आग्रा, 01 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) उत्तर प्रदेशातील आग्रा येथील एका आयटी कंपनीत काम करणाऱ्या तरूणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या तरूणाने आत्महत्या करण्यापूर्वी त्याच्या मोबाईलमध्ये एक व्हिडिओ रेकॉर्ड केला. या व्हिडिओत त्याने त्याच्या पत्नीवर गंभीर आरोप केले आहे. त्याचा हा व्हिडिओ सोशल सध्या मीडियावर व्हायरल होत आहे. पोलिसांनी याप्रकरणी या मृत तरूणाच्या वडिलांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला असून, सविस्तर तपास सुरू आहे.
https://x.com/ANI/status/1895389522801852714?t=n2dMj_hflRL8-AtburRIfw&s=19
पत्नीच्या वागणुकीमुळे आत्महत्येचा निर्णय?
मिळालेल्या माहितीनुसार, मानव शर्मा (वय 30, रा. डिफेन्स कॉलनी, आग्रा) हा एका आयटी कंपनीत रिक्रूटमेंट मॅनेजर म्हणून कार्यरत होता. 1 जानेवारी 2024 रोजी त्याचा विवाह निकिता हिच्यासोबत हिंदू रीतिरिवाजानुसार झाला होता. त्यांचे हे लग्न हुंडा न घेता झाले होते. मात्र, लग्न झाल्यापासून पत्नीकडून त्याला व त्याच्या कुटुंबाला मानसिक त्रास सहन करावा लागत होता. त्याची पत्नी लहानसहान गोष्टींवरून रागावायची आणि घरात भांडणे करत असल्याचे मानव शर्माच्या वडिलांचे म्हणणे आहे.
वडिलांची पोलिसांत तक्रार
याप्रकरणी मानवच्या वडिलांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद केले की, “त्यांचा मुलगा लग्नानंतर पत्नीला सोबत घेऊन मुंबईत गेला होता. मात्र, तेथेही ती वारंवार भांडण करत असे आणि आत्महत्येची धमकी देऊन मुलाला गुन्ह्यात अडकवण्याची भीती दाखवत असे. हे सर्व सांगितल्यानंतर कुटुंबाने त्याला धीर देत सर्वकाही ठीक होईल असे सांगितले, पण परिस्थिती अधिकच बिघडत गेली. सुनेच्या वागण्यात कोणतीही सुधारणा झाली नाही.”
पत्नीच्या माहेरी अपमान?
त्यानंतर मानव आणि निकिता 23 फेब्रुवारी 2025 रोजी मुंबईवरून आग्रा येथे परतले. त्याच दिवशी तो पत्नीसोबत तिच्या माहेरी गेला. तेथे तिच्या नातेवाईकांनी त्याला अपमानित केले आणि आत्महत्येस प्रवृत्त केले, असा आरोप वडिलांनी केला आहे. या प्रकारामुळे त्रस्त झालेल्या मानवने 27 फेब्रुवारी रोजी गळफास लावून आत्महत्या केली. असे त्याच्या वडिलांनी तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, या घटनेनंतर कुटुंबीयांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
पोलिसांनी काय माहिती दिली?
या घटनेबाबत बोलताना डीसीपी सूरज राय यांनी सांगितले की, “27 फेब्रुवारी रोजी सोशल मीडियावर एका तरूणाने आत्महत्या करण्यापूर्वी मोबाईलवर एक व्हिडिओ रेकॉर्ड केला. पोलिसांना या व्हिडिओची माहिती सोशल मीडियावरून मिळाली. या प्रकरणी सदर बाजार पोलीस ठाण्यात संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व आरोपांची चौकशी करून पुराव्यांच्या आधारे कारवाई करण्यात येईल,” असे त्यांनी म्हटले आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ माजली असून, पोलिसांकडून मृताच्या पत्नी व तिच्या कुटुंबीयांची चौकशी सुरू आहे.