मुंबई, 01 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) राज्यात 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (एचएसआरपी) बसवण्याचे काम सुरू असून, या नंबर प्लेटसाठी आकारण्यात येणाऱ्या दरांवरून सध्या राज्याचे राजकीय वातावरण तापले आहे. यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात एचएसआरपी नंबरप्लेटचे दर सर्वाधिक असल्याचा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला होता. त्यांच्या या आरोपावर राज्य सरकारने स्पष्टीकरण दिले आहे.
https://x.com/PTI_News/status/1895699062881730724?t=V5T66tCy9MVfD_8YeTL9Qw&s=19
राज्य सरकारचे स्पष्टीकरण
राज्य सरकारने याबाबत स्पष्टीकरण देत म्हटले आहे की, महाराष्ट्रातील एचएसआरपी नंबर प्लेटचे दर अन्य राज्यांच्या दरांप्रमाणेच आहेत. अन्य राज्यांमध्ये जीएसटी वगळता दुचाकींसाठी 420 ते 480 रुपये, तीन चाकी वाहनांसाठी 450 ते 550 रुपये आणि चार चाकी व जड वाहनांसाठी 690 ते 800 रुपये शुल्क आकारले जाते. महाराष्ट्रात हेच दर अनुक्रमे दुचाकी 450 रुपये, तीन चाकी 500 रुपये आणि चार चाकी व जड वाहनांसाठी 745 रुपये आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील दर अन्य राज्यांच्या तुलनेत अधिक असल्याचा आरोप चुकीचा आहे, असे सरकारने स्पष्ट केले आहे.
https://x.com/supriya_sule/status/1895315621761458573?t=vFmm99npyBQzYnjLM6X5yg&s=19
सुप्रिया सुळेंचा आरोप
दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करून या निर्णयावर आक्षेप घेत राज्य सरकारवर टीका केली होती. “वाहनांना एचएसआरपी नंबरप्लेट लावण्याची सक्ती शासनाकडून करण्यात येत आहे. यासाठी वाहनचालकांकडून अव्वाच्या सव्वा रक्कम उकळण्यात येत आहे.या नंबर प्लेटचे इतर राज्यांच्या तुलनेतील दर पाहिले असता महाराष्ट्रात सर्वात जास्त म्हणजे जवळपास तिप्पट दर ठेवण्यात आले आहेत. विशेष म्हणजे याबाबतचा निर्णय मंत्रिमंडळाच्या स्थापनेपूर्वी परस्पर घेण्यात आला. हा निर्णय नेमके कुणाचे उखळ पांढरे करण्यासाठी घेतला हे उघड होणे गरजेचे आहे. जनतेला जाचक ठरणाऱ्या या निर्णयाचा आम्ही निषेध करतो,” असे सुप्रिया सुळे यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.
एचएसआरपी नंबर प्लेट म्हणजे काय?
केंद्रीय मोटार नियम 1989 नुसार, देशातील सर्व गाड्यांना ‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट’ (एचएसआरपी) नंबर प्लेट लावणे आवश्यक आहे. 1 एप्रिल 2019 नंतर विकल्या गेलेल्या गाड्यांना ही नंबर प्लेट आधीपासूनच लावली जात आहे. 1 एप्रिल 2019 पूर्वी विकल्या गेलेल्या जुन्या गाड्यांनाही ही नंबर प्लेट लावणे गरजेचे आहे. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत. दरम्यान, हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट’ (एचएसआरपी) ही एक सुरक्षित आणि छेडछाड न करता येणारी नंबर प्लेट आहे. यामुळे वाहनाची सुरक्षा वाढते आणि वाहन चोरीला आळा बसतो.