दिल्ली, 01 मार्च: (विश्वजीत खाटमोडे) मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी देशातील नागरिकांना महागाईचा झटका बसला आहे. तेल विपणन कंपन्यांनी आज (1 मार्च) व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत वाढ केली आहे. 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात 6 रुपयांची वाढ करण्यात आली असून, ही नवी दरवाढ आजपासून लागू झाली आहे. गेल्या महिन्यात व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमतीत 7 रुपयांची कपात करण्यात आली होती. मात्र, यावेळी किंमत वाढल्यामुळे हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि इतर व्यावसायिक ठिकाणी गॅसचा खर्च वाढणार आहे. याचा अप्रत्यक्ष परिणाम जेवणाच्या किमतींवर होऊ शकतो, ज्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर अधिक ताण पडण्याची शक्यता आहे.

नव्या किंमती पहा
नव्या दरवाढीनुसार, दिल्लीमध्ये 19 किलोचा व्यावसायिक गॅस सिलिंडर 1797 रुपयांवरून 1803 रुपयांवर गेला आहे. मुंबईत हा सिलिंडर 1749.50 रुपयांवरून 1755.50 रुपयांपर्यंत महागला आहे. कोलकात्यात त्याची किंमत 1907 रुपयांवरून 1913 रुपये झाली असून, चेन्नईत हा दर 1959.50 रुपयांवरून 1965 रुपये इतका वाढला आहे.

घरगुती गॅसचे दर जैसे थे!
तथापि, 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत शेवटचा बदल 1 ऑगस्ट 2024 रोजी झाला होता. सध्या दिल्लीमध्ये घरगुती गॅस सिलिंडर 803 रुपयांना मिळत आहे. मुंबईत त्याची किंमत 802.50 रुपये असून, कोलकातामध्ये तो 829 रुपयांना आणि चेन्नईत 818.50 रुपयांना मिळत आहे. दरम्यान, व्यावसायिक गॅस सिलिंडर महाग झाल्यामुळे त्याचा परिणाम हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सच्या जेवणाच्या दरांवर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महागाईचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसू शकतो.

