पुणे, 28 फेब्रुवारी: (विश्वजीत खाटमोडे) पुण्यातील बसमधील बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय रामदास गाडे याला आज (दि.28) न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी पुण्याच्या न्यायिक दंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायालयाने त्याला 12 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याची माहिती आरोपीचे वकील वाजिद खान यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे. दरम्यान, आरोपी दत्तात्रय गाडे याच्यावर पुण्यातील स्वारगेट बस स्थानक परिसरात उभ्या बसमध्ये एका 26 वर्षीय तरूणीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे.
https://x.com/ANI/status/1895466060121579928?t=ioPdOGrReZiHngrOWs4sow&s=19
https://x.com/ANI/status/1895471767952777340?t=8CWRxOhP0_V4odoGhbTtNw&s=19
आरोपीच्या वकिलांनी काय म्हटले?
या प्रकरणात पोलिसांनी त्याला काल (दि.28) मध्यरात्री शिरूर तालुक्यातील गुणाट या गावातून अटक केली. त्यानंतर त्याला आज पुण्यातील न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी आरोपीचे वकील वाजिद खान यांनी न्यायालयात युक्तिवाद केला. यावेळी त्याच्या वकिलांनी म्हटले की, “दत्तात्रय गाडे याच्यावर यापूर्वीच्या प्रकरणांमध्ये चोरीचे गुन्हे दाखल होते, बलात्काराचे नव्हते. तपास अधिकाऱ्यांनी त्याला सराईत गुन्हेगार म्हटले असले तरी तो पूर्वीच्या कोणत्याही प्रकरणात दोषी ठरलेला नाही. सदर घटनेच्या वेळी पहाटे 5.45 वाजले होते, त्या तरूणीने मदतीसाठी आरडाओरडा का केला नाही? काहीही जबरदस्ती करण्यात आलेले नाही.” असे त्यांनी म्हटले आहे. त्यावेळी या आरोपीला न्यायालयाने 12 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
अशी घडली घटना
दरम्यान, पुण्यातील स्वारगेट बसस्थानक हे एसटी महामंडळाच्या सर्वात मोठ्या बसस्थानकापैकी एक आहे. ही पीडित तरूणी मंगळवारी (दि.28) पहाटे 5.45 वाजण्याच्या सुमारास सातारा जिल्ह्यातील फलटणला जाणाऱ्या बसची वाट पाहत होती. तेंव्हा आरोपीने तिच्याशी गप्पा मारल्या, तसेच त्याने फलटणला जाणारी बस दुसरीकडे थांबली असल्याचे खोटे सांगितले. त्यानंतर तो तिला डेपोत दुसऱ्या ठिकाणी उभ्या असलेल्या रिकाम्या शिवशाही बसमध्ये घेऊन गेला आणि अंधाराचा फायदा घेऊन त्याने तिच्यावर बलात्कार केला, असे पीडित तरूणीने दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे.