संतोष देशमुख हत्या प्रकरणी उज्वल निकम विशेष सरकारी वकील नियुक्त

मुंबई, 25 फेब्रुवारी: (विश्वजीत खाटमोडे) बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात महाराष्ट्र सरकारने ज्येष्ठ वकील ॲड. उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे. तसेच या खटल्यासाठी ॲड. बाळासाहेब कोल्हे यांची उज्वल निकम यांचे सहायक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती बीडच्या सत्र न्यायालयात संतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रलंबित असलेल्या खालील गुन्ह्यांसंबंधीची प्रकरणे हाताळण्यासाठी करण्यात आली आहे. याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि.26) दिली आहे.

https://x.com/Dev_Fadnavis/status/1894613230393143554?t=BNkc2cKs36M5cMLUK2t9Ng&s=19

एक आरोपी फरार

बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 रोजी हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात आतापर्यंत 7 आरोपींना अटक करण्यात आली असून, तर या प्रकरणातील कृष्णा आंधळे हा आरोपी अद्याप फरार आहे. त्याचा सध्या पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. परंतु या फरार आरोपीला पकडण्यास पोलिसांना अपयश आले आहे. त्यामुळे या फरार आरोपीला लवकरात लवकर अटक करण्यात यावी, अशी मागणी देशमुख कुटुंबीय आणि मस्साजोगचे ग्रामस्थ यांनी केली आहे. दरम्यान, अटक करण्यात आलेल्या या आरोपींमध्ये वाल्मिक कराडचा देखील समावेश आहे. या सर्व आरोपींच्या विरोधात मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरण

संतोष देशमुख यांच्या हत्येचे कारण मस्साजोग येथील एका पवनचक्की कंपनीच्या खंडणी प्रकरणाशी संबंधित असल्याचा संशय आहे. संतोष देशमुख यांनी या खंडणी प्रकरणात विरोध केला होता, ज्यामुळे त्यांची हत्या केली गेली असा आरोप करण्यात आला आहे. राज्य सरकारने या प्रकरणाचा सखोल तपास करण्याचे पोलीस प्रशासनाला आदेश दिले आहेत. तसेच या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. या विशेष तपास पथकामार्फत संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *