तिरुवनंतपुरम, 24 फेब्रुवारी: (विश्वजीत खाटमोडे) केरळमध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. केरळच्या वेनजरमूडू पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक मोठे हत्याकांड उघडकीस आले आहे. येथे एका तरूणाने आपल्या प्रेयसीसह कुटुंबातील 5 जणांची हत्या केली असून, या हल्ल्यात त्याची आई देखील गंभीर जखमी झाली आहे. अफान (वय 23) असे या तरूणाचे नाव आहे. सोमवारी (दि.24) सायंकाळी ही घटना घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
https://x.com/ANI/status/1894326117324263683?t=TUXLZq7Vap1gmiiFTITgiA&s=19
पोलिसांनी दिली माहिती
आरोपीच्या कबुलीनंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. त्या तरूणाने सांगितले की, त्याने त्याची आजी, काका, भाऊ आणि प्रेयसीसह 6 जणांची हत्या केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, अफानने आपल्या आजी, चुलता, चुलती, 14 वर्षीय भाऊ आणि प्रियसी यांची क्रूरपणे हत्या केली. तसेच या आरोपीने आपल्या आईवरही हल्ला केला असून तिची प्रकृती गंभीर आहे. तिच्यावर सध्या थिरुवनंतपुरमच्या वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत.
https://x.com/ANI/status/1894340088467001547?t=BWWf4_xccDM83jOHawCCdw&s=19
आरोपीचे विष प्राशन
दरम्यान, या आरोपीने पोलिसांना सांगितले की, त्याने ही हत्या एका ठिकाणी न करता, तीन वेगवेगळ्या घरांमध्ये जाऊन त्याने आपल्या नातेवाईक व प्रियसीचा बळी घेतला. या हत्याकांडानंतर तो स्वतःच वेनजरमूडू पोलीस ठाण्यात शरण गेला आणि सहा जणांचा खून केल्याची कबुली दिली. पोलीस चौकशीदरम्यान, या आरोपीने विष घेतल्याचेही समोर आले. त्यामुळे पोलिसांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले आहे.
हत्येचे कारण अस्पष्ट
या हत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी कौटुंबिक किंवा व्यक्तिगत कारणांमुळे त्याने हे अमानुष कृत्य केल्याची शक्यता आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, आरोपीच्या मानसिक स्थितीचा अभ्यास केला जात आहे. हत्याकांडामागील सत्य काय आहे? याचा सध्या शोध सुरू आहे.