मुंबई, 24 फेब्रुवारी: (विश्वजीत खाटमोडे) राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 3 मार्च 2025 पासून सुरू होणार असून, ते 26 मार्च 2025 पर्यंत चालणार आहे. या अधिवेशनात राज्याचा अर्थसंकल्प 10 मार्च रोजी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत सादर केला जाणार आहे. यावेळी अर्थमंत्री अजित पवार महाराष्ट्राचा अर्थसंकल्प मांडतील. त्यामुळे या अर्थसंकल्पात राज्य सरकार कोणत्या नव्या घोषणा करणार? याकडे राज्यातील सर्व नागरिकांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, या अर्थसंकल्पीय अधिवेशन कालावधीत शनिवार दि. 8 मार्च रोजी सार्वजनिक सुटीच्या दिवशी विधिमंडळाचे कामकाज सुरू राहील, तर 13 मार्च होळीनिमित्त कामकाजास सुटी देण्याचे या बैठकीत ठरविण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिली आहे.
https://x.com/CMOMaharashtra/status/1893588565143196033?t=yb5I5FcUjVL8E1OqQTASPw&s=19
तत्पूर्वी, आगामी विधिमंडळ अधिवेशनाच्या कामकाजावर चर्चा करण्यासाठी मुंबईतील विधानभवन येथे विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीची बैठक पार पडली. या बैठकीत अधिवेशनाच्या रूपरेषेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी विधान परिषदेचे अध्यक्ष राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार, संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील तसेच अनेक मंत्री व आमदार उपस्थित होते.
अर्थसंकल्पाकडे सर्वांचे लक्ष!
दरम्यान, या अर्थसंकल्पीय अधिवेशनात महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, पायाभूत सुविधा, आरोग्य आणि शिक्षण यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर या अधिवेशनात चर्चा होण्याची अपेक्षा आहे. राज्य सरकार आगामी अर्थसंकल्पात लोकहिताच्या योजनांना प्राधान्य देईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. शेतकरी कर्जमाफी, रोजगारनिर्मिती, नवीन औद्योगिक गुंतवणूक याविषयी सरकार निर्णय घेणार का? याकडे ही सर्वांचे लक्ष असणार आहे. यासोबतच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेत महिलांना मिळणारी लाभाची रक्कम सरकारकडून वाढविली जाणार का? हे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे. त्यामुळे राज्यातील जनतेचे या अर्थसंकल्पीय अधिवेशनाकडे लक्ष लागले आहे.