पुणे, 23 फेब्रुवारी: (विश्वजीत खाटमोडे) मुंबई आणि कोकणातील तापमान सातत्याने वाढत असून, गेल्या 3 दिवसांपासून मुंबईत कमाल तापमान 37 अंशांच्या पुढे गेल्याने उष्णतेचा प्रभाव जाणवत आहे. तर येत्या 3 दिवसांत देखील उन्हाची तीव्रता वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. या पार्श्वभूमीवर, भारतीय हवामान विभागाच्या (आयएमडी) मुंबई प्रादेशिक हवामान केंद्राने पुढील तीन दिवस राज्यातील मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. याची माहिती भारतीय हवामान विभागाच्या पुणे वेधशाळेचे माजी प्रमुख के एस होसाळीकर यांनी दिली आहे.
https://x.com/Hosalikar_KS/status/1893639516423856519?t=sWrerNZ3w4wOCg_eM5gmOg&s=19
वाढत्या तापमानाची नोंद
आज, 23 फेब्रुवारी 2025 रोजी मुंबईतील कुलाबा येथे कमाल तापमान 35.0 अंश सेल्सिअस आणि सांताक्रूझ येथे 37.2 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. कोकणातील काही भागांत तापमान सरासरीपेक्षा अधिक असल्याने उष्ण आणि दमट हवामान जाणवत आहे. तर पुढील तीन दिवस मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी या चार जिल्ह्यांत उन्हाची तीव्रता कायम राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.
https://x.com/Hosalikar_KS/status/1893640994320417129?t=Hgo1DZDTDScEM7rg-zkSjg&s=19
यलो अलर्ट म्हणजे काय?
यलो अलर्ट म्हणजे उष्ण आणि दमट हवामानाची शक्यता असून, नागरिकांनी सावध राहण्याची आवश्यकता आहे. विशेषतः लहान मुले, वृद्ध आणि आरोग्यदृष्ट्या संवेदनशील लोकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. दुपारी 12 ते 3 या वेळेत उन्हात जाणे शक्यतो टाळा. भरपूर पाणी प्या आणि शरीर हायड्रेट ठेवा. हलके, आरामदायक आणि हवेशीर कपडे घाला. उन्हाच्या तीव्रतेपासून बचावासाठी टोपी, छत्री आणि गॉगलचा वापर करा. उष्णतेचा त्रास झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. कोकणातील वाढत्या उन्हामुळे नागरिकांनी सतर्क राहावे आणि हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.