मुंबई, 22 फेब्रुवारी: (विश्वजीत खाटमोडे) भारतीय चलनी नोटांमध्ये वापरल्या जाणाऱ्या सुरक्षा कागदाच्या आयात आणि नकली भारतीय नोटांच्या छपाईमध्ये सामील टोळ्यांविरोधात मोठी कारवाई करण्यात आली. महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय) ने 20 फेब्रुवारी 2025 रोजी महाराष्ट्र, हरियाणा, तेलंगणा, तामिळनाडू आणि बिहार या 5 राज्यांतील 11 ठिकाणी छापेमारी करून 7 टोळ्यांचा पर्दाफाश केला. या संपूर्ण कारवाईत एकूण 14 आरोपींना अटक करण्यात आले आहे. अशी माहिती वित्त मंत्रालयाने दिली आहे.
https://x.com/PIB_India/status/1892882844307116055?t=YzWXb5oa2P0BoALVOuYQOQ&s=19
मोठी कारवाई
सुरूवातीला, 8 फेब्रुवारी 2025 रोजी उत्तर प्रदेशातील गाझीपूर आणि कर्नाटकमधील बेंगळुरू येथे बनावट नोटांसाठी उच्च दर्जाचा सुरक्षा कागद आयात करणाऱ्या 2 जणांना अटक करण्यात आली होती. या कागदांवर ‘भारतीय रिझर्व्ह बँक’ आणि ‘भारत’ असे चिन्ह असलेला सुरक्षा धागा होता. त्यानंतर 9 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रातील ठाणे आणि हरियाणातील भिवानी येथे या सुरक्षा कागदांचा वापर करून बनावट नोटा छापणाऱ्या 2 ठिकाणांवर छापे टाकण्यात आले. या कारवाईत 3 आरोपींना अटक करण्यात आली.
मुंबईतून बनावट नोटा जप्त
मुंबईतील विक्रोळी पश्चिम येथे बनावट नोटांसाठी सुरक्षा कागद आयात करणाऱ्या आरोपीचा शोध घेण्यात आला. घनदाट लोकवस्तीत छापा टाकून बनावट नोटा छपाई केंद्राचा पर्दाफाश करण्यात आला. 50 आणि 100 रुपयांच्या नकली नोटा, प्रिंटर, लॅपटॉप, पेन ड्राइव्ह, सुरक्षा पेपर, महात्मा गांधींच्या वॉटरमार्क असलेले A-4 आकाराचे कागद आणि बटर पेपर जप्त करण्यात आले. डीआरआय अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आणि संपूर्ण यंत्रसामग्री जप्त करण्यात आली.
संगमनेर आणि कोल्हापुरात छापेमारी
संगमनेर आणि कोल्हापूर येथे बनावट नोटा छापण्यासाठी संगणक आणि प्रिंटरचा वापर केला जात असल्याची माहिती डीआरआयला मिळाली. या माहितीच्या आधारे दोन्ही ठिकाणी छापेमारी करून 2 आरोपींना अटक करण्यात आली आणि सर्व साहित्य जप्त करण्यात आले. तसेच कोल्हापुरात पकडलेल्या आरोपींच्या चौकशीतून पोलिसांना कर्नाटकातील बेळगाव येथे आणखी एक बनावट नोटांचे छपाई केंद्र असल्याची माहिती मिळाली. तिथे छापा टाकून 3 आरोपींना अटक करण्यात आली.
आंध्र प्रदेश, बिहार आणि हरियाणात अटक
त्याचबरोबर आंध्र प्रदेशातील पश्चिम गोदावरी, बिहार मधील खगडिया आणि हरियाणातील रोहतक याठिकाणी सुरक्षा कागद आयात करणाऱ्या आरोपींचा शोध घेण्यात आला. या कारवाईत पश्चिम गोदावरीमध्ये प्रतिबंधित सुरक्षा कागद आणि प्रिंटर, तर खगडिया जिल्ह्यातून लॅपटॉप, प्रिंटर आणि सुरक्षा कागद जप्त करण्यात आला. डीआरआय अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून स्थानिक पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली आणि पुढील तपास सुरू आहे. बनावट नोटा छापणाऱ्या टोळ्यांविरोधात ही मोठी मोहीम असून, तपास अधिक सुरू आहे.