पुणे, 21 फेब्रुवारी: (विश्वजीत खाटमोडे) महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची इयत्ता दहावीची परीक्षा आजपासून (21 फेब्रुवारी) सुरू झाली आहे. ही परीक्षा 17 मार्च 2025 पर्यंत चालणार आहे. राज्यभरातील 16 लाखांहून अधिक विद्यार्थी यंदा परीक्षा देत आहेत. मागील वर्षी 15 लाख 60 हजार 154 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती.
कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येणार
ही परीक्षा राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत घेतली जात आहे. ही परीक्षा सुरळीत आणि प्रामाणिकपणे पार पडण्यासाठी शिक्षण मंडळाने “कॉपीमुक्त अभियान” राबवण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर शिक्षण मंडळाने परीक्षा केंद्रांवर कठोर उपाययोजना केल्या आहेत.
भरारी पथके तैनात
गैरप्रकार रोखण्यासाठी प्रत्येक परीक्षा केंद्रावर पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. तसेच, भरारी पथके नियुक्त करून अचानक तपासणी केली जाणार आहे. परीक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर आणि त्यांना मदत करणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा शिक्षण मंडळाने दिला आहे.
शिक्षण मंडळाचे आवाहन
विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारच्या चुकीच्या मार्गांचा अवलंब न करता परीक्षेची तयारी करावी आणि प्रामाणिकपणे उत्तरपत्रिका लिहावी, असे आवाहन शिक्षण मंडळाने केले आहे. शिक्षक आणि पालकांनीही विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन करून प्रामाणिक परीक्षा देण्यासाठी प्रोत्साहित करावे, असेही सांगण्यात आले आहे.
https://x.com/mieknathshinde/status/1892756125671436788?t=6ZPn3FcCrcfxfjbVPRqHGQ&s=19
https://x.com/AjitPawarSpeaks/status/1892777034226471258?t=OnMGIqzbnzUH59jyHVX3GA&s=19
दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा
दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी सोशल मीडियावरून शुभेच्छा दिल्या आहेत. “यशवंत व्हा, गुणवंत व्हा! आजपासून इयत्ता दहावी बोर्डाच्या परीक्षा सुरू होत आहे. या परीक्षेला बसणाऱ्या तमाम विद्यार्थी-विद्यार्थिनींना मनःपूर्वक शुभेच्छा!” असे अजित पवारांनी म्हटले आहे. तर, “यशस्वी भव:, दहावीच्या अर्थात एसएससी परीक्षेला बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! आत्मविश्वास, चिकाटी आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवून परीक्षेला सामोरे जा. यश नक्कीच तुमचेच आहे.” असे एकनाथ शिदेंनी म्हटले आहे.