नाशिक, 20 फेब्रुवारी: (विश्वजीत खाटमोडे) महाराष्ट्राचे कृषिमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू विजय कोकाटे यांना एका फसवणुकीच्या प्रकरणात 2 वर्षांची शिक्षा आणि 50,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या निधीतून राखीव कोट्यातून फ्लॅट मिळवण्यासाठी खोटे दस्तऐवज सादर करून फसवणूक केल्याच्या गुन्ह्यात त्यांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात सध्या एकच खळबळ उडाली आहे.
https://x.com/ANI/status/1892517801124057578?t=sE2fKAdTwsOkWj15iwm8vQ&s=19
सरकारी वकिलांनी काय म्हटले?
सहायक सरकारी वकील पूनम घोटके यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, “या प्रकरणात आम्ही एकूण 10 साक्षीदार तपासले. सर्व साक्षीदारांची चौकशी केल्यानंतर न्यायालयाने माणिकराव कोकाटे आणि विजय कोकाटे यांना दोषी ठरवून 2 वर्षांची शिक्षा आणि 50,000 रुपयांचा दंड ठोठावला.” तर न्यायालयाच्या या निर्णयामुळे माणिकराव कोकाटे यांची आमदारकी आणि मंत्रिपद धोक्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
काय आहे प्रकरण?
हे प्रकरण 1997 मधील असून, मुख्यमंत्र्यांच्या निधीतून 10 टक्के राखीव कोट्यातून मिळालेल्या फ्लॅट्सशी संबंधित आहे. यासंदर्भात कोकाटे बंधूंनी अर्ज करताना खोटे दस्तऐवज सादर केले होते. अर्जामध्ये त्यांनी स्वतःकडे कोणतेही घर नसल्याचा व आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याचा दावा केला होता. मात्र, नंतरच्या चौकशीत हे दोन्ही दावे खोटे असल्याचे स्पष्ट झाले.
राजकीय वर्तुळात खळबळ
या घोटाळ्याचा तपास अनेक वर्षे सुरू होता. त्यानंतर जिल्हा न्यायालयाने आज (दि.20) याप्रकरणात दोघांनाही दोषी ठरवले. या निर्णयामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून, मंत्री पदावर असलेल्या व्यक्तीला शिक्षा झाल्याने सत्ताधारी पक्षावरही जोरदार टीका केली जात आहे. माणिकराव कोकाटे आणि विजय कोकाटे यांची पुढील कायदेशीर रणनीती काय असेल? तसेच ते उच्च न्यायालयात अपील करतील का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. या निकालामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात विविध प्रकारच्या चर्चांना सुरूवात झाली आहे.