दुबई, 20 फेब्रुवारी: (विश्वजीत खाटमोडे) क्रिकेटप्रेमींसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे, कारण चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील भारताचा पहिला सामना आज (दि.20) बांगलादेशविरुद्ध रंगणार आहे. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार दुपारी 2:30 वाजता सुरू होणार आहे. त्यामुळे आजच्या सामन्याकडे क्रिकेट रसिकांचे लक्ष लागले आहे.
https://x.com/ICC/status/1892393739790012630?t=TUs1z43idurH-Jb_SXBrng&s=19
टीम इंडिया फॉर्मात
तत्पूर्वी, भारतीय संघाने नुकत्याच संपलेल्या इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेत प्रभावी प्रदर्शन करत 3-0 ने विजय मिळवला होता. त्यामुळे संघाचा आत्मविश्वास उंचावलेला आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि प्रमुख खेळाडू विराट कोहली, केएल राहुल, श्रेयस अय्यर आणि शुभमन गिल दमदार कामगिरीसाठी सज्ज आहेत. वेगवान गोलंदाजीची जबाबदारी मोहम्मद शमी आणि अर्शदीप सिंग, तर फिरकीचा भार रवींद्र जडेजा, वरूण चक्रवर्ती कुलदीप यादव आणि अक्षर पटेल सांभाळतील.
इतिहास भारताच्या बाजूने
भारत आणि बांगलादेश यांच्यात आतापर्यंत 41 वनडे सामने खेळले गेले असून, त्यापैकी भारताने 32 सामने जिंकले, तर बांगलादेशने 8 विजय मिळवले आहेत. दुबईमध्ये झालेल्या दोन्ही सामन्यांत भारतानेच वर्चस्व गाजवले आहे. त्यामुळे या सामन्यात देखील भारतीय संघाचे पारडे जड असणार आहे.
भारत पाकिस्तान एकाच गटात
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 या स्पर्धेत भारतीय संघ ए गटात आहे, जिथे त्याच्यासोबत पाकिस्तान, बांगलादेश आणि न्यूझीलंड हे संघ आहेत. तर ब गटात इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका हे संघ खेळणार आहेत.
भारतीय संघाचे गटातील सामने
20 फेब्रुवारी: भारत वि. बांगलादेश (दुबई)
23 फेब्रुवारी: भारत वि. पाकिस्तान (दुबई)
2 मार्च: भारत वि. न्यूझीलंड (दुबई)
भारताचे सर्व सामने दुबईत!
दरम्यान, पाकिस्तानने स्पर्धेचे यजमानपद मिळवले असले तरी सुरक्षेच्या कारणास्तव भारतीय संघ पाकिस्तानला जाणार नाही. त्यामुळे भारताचे सर्व सामने दुबईतच खेळवले जातील. त्यामुळे या स्पर्धेतील इतर देशांचे सामने पाकिस्तानात खेळण्यात येणार आहेत. तर भारतीय संघाचे सर्व सामने दुबईत खेळविण्यात येतील.
सामने कोठे दिसणार?
आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी स्पर्धेच्या सर्व सामन्यांचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्क वर थेट केले जाईल. तसेच हे सामने JioHotstar या ॲपवर देखील फ्री मध्ये पाहता येतील.
भारतीय संघ:- रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), रिषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, रवींद्र जडेजा आणि वरूण चक्रवर्ती.
बांगलादेश संघ:- नजमुल हसन शांतो (कर्णधार), सौम्य सरकार, तन्जीद हसन, तौहीद हृदोय, मुशफिकुर रहीम (यष्टिरक्षक), मोहम्मद महमुदुल्लाह, जकर अली अनिक, मेहदी हसन मिराज, रिशाद हसन, तस्किन अहमद, मुस्तफिजुर रहमान, परवेझ हसन इमॉन, नसुम अहमद, तन्झीम हसन साकिब आणि नाहिद राणा.