पुणे, 16 फेब्रुवारी: (विश्वजीत खाटमोडे) पुण्यात सुरू असलेल्या गुईलेन-बारे सिंड्रोम (जीबीएस) साथीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कच्चे किंवा अपूर्ण शिजवलेले चिकन खाणे टाळावे, असा सल्ला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला. पुणे महानगरपालिकेच्या 75 व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी या साथीबाबत जनतेत गैरसमज पसरू नयेत, असे आवाहन केले. यासंदर्भातील बातमी एएनआय वृत्तसंस्थेने दिली आहे.
अजित पवार काय म्हणाले?
“मी विमानतळावर विभागीय आयुक्तांची भेट घेतली आणि पुण्यातील जीबीएसच्या परिस्थितीबाबत चर्चा केली. खडकवासला धरण परिसरात हा आजार आढळून आला असून, काही जण दूषित पाण्यामुळे हा आजार होत असल्याचे म्हणत आहेत, तर काहींनी चिकनला कारणीभूत ठरवले आहे. मात्र सखोल आढावा घेतल्यानंतर कच्चे किंवा अपूर्ण शिजवलेले चिकन खाल्ल्याने जीबीएसची लागण होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे नागरिकांनी चिकन योग्य पद्धतीने शिजवून खावे, असा सल्ला अजित पवार यांनी दिला आहे. मात्र सखोल आढावा घेतल्यानंतर कोंबड्या नष्ट करण्याची आवश्यकता नाही, असा निर्णय घेण्यात आला आहे,” असे उपमुख्यमंत्री पवार म्हणाले.
अन्न पूर्णपणे शिजवूनच खावे
“डॉक्टरांनी सुचवले आहे की, चिकन किंवा अन्न पूर्णपणे शिजवूनच खावे. जर ते अर्धवट शिजलेले असेल, तर अशा प्रकारच्या समस्या निर्माण होऊ शकतात. जीबीएस ची परिस्थिती नियंत्रणात आहे. लवकरच अधिकाऱ्यांना निर्देश दिले जातील आणि अधिकृत प्रेस नोट जारी केले जाईल. नागरिकांनी घाबरू नये, तसेच माध्यमांनी भीती पसरवू नये,” असे ते म्हणाले.
181 जणांना जीबीएसची लागण
महाराष्ट्र आरोग्य विभागाने शनिवारी (दि.16) दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आतापर्यंत 181 जणांना जीबीएस असल्याचे निदान झाले आहे, तर 27 संशयित रुग्ण आढळले आहेत. या आजारामुळे राज्यभरात आत्तापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला असून त्यापैकी 4 मृत्यू जीबीएस मुळे झाल्याचे निश्चित झाले आहे, तर यापैकी 4 जणांचा मृत्यू कशामुळे झाला? याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. तसेच यामध्ये पुणे महानगरपालिकेत 42 रुग्ण, पुणे महानगरपालिका क्षेत्रात नव्याने समाविष्ट झालेल्या गावांमध्ये 94 रुग्ण, पिंपरी-चिंचवडमध्ये 30 रुग्ण, पुणे ग्रामीण भागात 32 रुग्ण आणि इतर जिल्ह्यांत 9 रुग्ण आढळले आहेत. सध्या 120 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून, 47 रुग्ण आयसीयू मध्ये उपचार घेत आहेत, तर 20 जण व्हेंटिलेटरवर आहेत.