बारामती, 14 फेब्रुवारी: विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल अभिनेता राहुल सोलापूरकर यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी भाजपचे पश्चिम महाराष्ट्र सोशल मिडिया सहसंयोजक ॲड. अक्षय गायकवाड यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम यांना एक निवेदन दिले आहे.
कायदेशीर कारवाई करण्याची मागणी
राहुल सोलापूरकर यांच्या वक्तव्यामुळे समाजामध्ये तेढ निर्माण झाला आहे. राहुल सोलापूरकर हा आंबेडकरवादी लोकांच्या भावना तीव्र करत असून तरी तो खोटा प्रचार करत आहे. राहुल सोलापूरकर मुळे समाजामध्ये जातीय तेढ निर्माण होत आहे. त्यामुळे समाजामध्ये तीव्र भावना निर्माण झाल्या आहेत. तरी आयोगाने याची तातडीने दखल घेऊन राहुल सोलापूरकर यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी ॲड. अक्षय गायकवाड यांनी यामध्ये केली आहे.
तत्पूर्वी, राहुल सोलापूरकर यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे वेदांना मानणारे आणि ब्राम्हण होते, असे विधान केले होते. त्यांचा हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता. त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ आंबेडकर अनुयायी आणि विविध संघटना आक्रमक झाल्या आहेत. याप्रकरणी राहुल सोलापूरकर यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यामुळे राहुल सोलापूरकर यांच्यावर कारवाई होणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.