पुणे, 12 फेब्रुवारी: (विश्वजीत खाटमोडे) पुणे शहरातील शिवाजीनगर येथे आधुनिक सोयींनी युक्त बसस्थानक उभारावे आणि राज्य मार्ग परिवहन महामंडळासोबत महामेट्रो ने समन्वयाने काम करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. शिवाजीनगर बसस्थानक पुनर्बांधणीबाबत आज (दि.12) झालेल्या आढावा बैठकीत त्यांनी हे निर्देश दिले.
https://x.com/AjitPawarSpeaks/status/1889584189785219258?t=98MGLDsgFuWJoat1P-gTUw&s=19
उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश
शिवाजीनगर बसस्थानकाची पुनर्बांधणी ही पुणे शहराच्या वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाची असून, ती वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण होणे आवश्यक आहे, असे अजित पवार म्हणाले. हा प्रकल्प ‘सार्वजनिक-खासगी भागीदारी’ तत्त्वावर राबवण्यात येणार असून, त्यासाठी ‘महामेट्रो’ आणि राज्य मार्ग परिवहन महामंडळाने समन्वयाने काम करावे, असे निर्देश त्यांनी बैठकीत दिले.
99 वर्षांचा करार करण्याचा प्रस्ताव
या प्रकल्पासाठी चांगले विकासक मिळण्यासाठी 99 वर्षांचा करार करण्याचा प्रस्ताव तातडीने मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर करावा, असे निर्देशही उपमुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले. या प्रकल्पामुळे पुणेकरांना जलद आणि सुयोग्य सुविधा मिळणार आहेत.
महामेट्रो आणि परिवहन महामंडळ यांच्यात सामंजस्य करार करणार
शिवाजीनगर बसस्थानकाच्या जागेवरील चटई क्षेत्राचा उपयोग करून प्रकल्पाची आर्थिक गुंतवणूक सुलभ करण्यासाठी तो ‘सार्वजनिक-खासगी भागीदारी’ तत्त्वावर राबवला जाणार आहे. ‘महामेट्रो’ प्रकल्प कार्यान्वयन यंत्रणा म्हणून काम करणार असून, त्यासाठी ‘महामेट्रो’ आणि राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्यात नवा सामंजस्य करार करण्यात येणार आहे, असे अजित पवारांनी सांगितले आहे.
स्वारगेट बसस्थानक ही महत्त्वाचा प्रकल्प
यासोबतच स्वारगेट येथेही अत्याधुनिक बसस्थानक उभारणीसाठी आवश्यक कार्यवाही पूर्ण करावी, असे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. शिवाजीनगर बसस्थानकासह स्वारगेट बसस्थानक विकास प्रकल्प पुणे शहराच्या वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असून, तो वेळेत आणि प्रभावीपणे पूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी बैठकीत दिले.
प्रकल्पातील महत्त्वाची वैशिष्ट्ये:
आधुनिक बसस्थानकासोबत व्यावसायिक संकुलाची उभारणी.
वाहनतळासाठी दोन तळघर.
किरकोळ विक्रीसाठी सेमी-बेसमेंट.
बसस्थानक तळमजल्यावर, बसआगार पहिल्या मजल्यावर आणि बस वाहनतळ दुसऱ्या मजल्यावर.
शासकीय व खाजगी कार्यालयांसाठी 16 मजली इमारत.