छत्तीसगड: 31 नक्षलवाद्यांचा खात्मा, दोन जवान शहीद

छत्तीसगड मध्ये सुरक्षा दलांकडून 31 नक्षलवाद्यांचा खात्मा, 2 जवान शहीद

बीजापूर, 09 फेब्रुवारी: (विश्वजीत खाटमोडे) छत्तीसगडच्या बीजापूर जिल्ह्यातील नॅशनल पार्क परिसरात रविवारी (दि.09) सकाळी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक झाली. या चकमकीत 31 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले असून, दोन जवान शहीद झाले आहेत. या कारवाईदरम्यान सुरक्षा दलांनी मोठ्या प्रमाणात हत्यारे आणि स्फोटके जप्त केली आहेत. पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आज सकाळी जंगलात ही चकमक सुरू झाली होती.

https://x.com/ANI/status/1888498957053276513?t=3MutgJtujydbMhamIOIPfw&s=19

https://x.com/ANI/status/1888536897867378831?t=pF5a1ZYuga8LAlLyZ0tChQ&s=19

अधिकाऱ्यांनी माहिती दिली

बस्तर परिक्षेत्राचे आयजी पी. सुंदरराज यांनी सांगितले की, जंगलात नक्षलवादी मोठ्या संख्येने जमा असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी शोधमोहीम राबवली. यावेळी नक्षलवादी आणि सुरक्षा दलाचे जवान यांच्यात चकमक उडाली. जोरदार प्रत्युत्तरादरम्यान 31 नक्षलवादी ठार झाले. या चकमकीत जिल्हा राखीव रक्षक (डीआरजी) दलाचे एक आणि विशेष टास्क फोर्स (एसटीएफ) चे एक असे 2 जवान शहीद झाले आहेत. तर दोन जवान जखमी झाले आहेत.

दोन जवान जखमी

राम किशन हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक संतोष सिंह म्हणाले की, “दोन जखमी जवानांना येथे उपचारासाठी आणण्यात आले आहे. आम्ही त्यांच्यावर लक्ष ठेवून आहोत, त्यानंतर आम्ही अधिक सांगू शकतो. त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर आहे.” दरम्यान, यापैकी एकाच्या पायाला दुखापत झाली आहे तर दुसऱ्याच्या डोक्याला आणि छातीला दुखापत झाली आहे.

हत्यारं आणि स्फोटके जप्त

सुरक्षा दलांनी ठार झालेल्या नक्षलवाद्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू केले आहे. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात एके-47, एसएलआर, रायफल्स, हँडग्रेनेड आणि स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. तर संपूर्ण जंगल परिसरात सध्या शोधमोहीम सुरू आहे. छत्तीसगडमधील नक्षलविरोधी लढाईसाठी ही मोठी कारवाई मानली जात आहे. पुढील तपशील लवकरच जाहीर केला जाईल, असे सुरक्षा दलांनी स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *