मुंबई, 08 फेब्रुवारी: मुंबईतील आरसीएफ पोलिसांनी शुक्रवारी (दि.08) चेंबूरच्या माहुल गावात गेल्या पाच वर्षांपासून बेकायदेशीरपणे राहत असलेल्या सात बांगलादेशी नागरिकांना अटक केली. त्यामध्ये तीन पुरूष आणि चार महिलांचा समावेश आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. तर याच्याआधी नाशिक मध्ये तसेच दिल्लीतही बेकायदेशीरपणे राहत असलेल्या अनेक बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी अटक केलेली आहे.
https://x.com/ANI/status/1887847011153817866?t=jdHkAy7Sd9pR_Bt5FBdv8g&s=19
नाशिकात मोठी कारवाई
तत्पूर्वी, 6 फेब्रुवारी रोजी नाशिक पोलिसांनी एका गुप्त माहितीनंतर कारवाई करत एका बांधकाम ठिकाणी छापा टाकून आठ बांगलादेशी नागरिकांना अटक केली. हे सर्वजण भारतीय नागरिकत्वाचा कोणताही वैध पुरावा सादर करू शकले नाहीत. नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सांगितले की, “एका बांधकाम साईटवर 600 कामगारांमध्ये काही बांगलादेशी नागरिक काम करत असल्याची माहिती आम्हाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी गुप्त तपास करून आठ जणांना ताब्यात घेतले आणि चौकशीत ते बांगलादेशी असल्याचे स्पष्ट झाले.” या बांगलादेशी घुसखोरांनी भारतात प्रवेश कसा केला? आणि त्यांना भारतीय ओळखपत्रे कशी मिळाली? याची चौकशी सुरू आहे. त्यांच्या मोबाईल फोन, आधार कार्ड, पॅन कार्ड यासह इतर दस्तऐवज पोलिसांनी जप्त केले आहेत.
दिल्लीत 21 बांगलादेशी ताब्यात
त्याचबरोबर दिल्ली पोलिसांनीही अवैध बांगलादेशी घुसखोरांविरोधात मोठी कारवाई करत 18 जणांना शनिवारी परत पाठवले असून, तीन जणांना अटक केली आहे. दिल्लीचे केंद्रीय जिल्हा पोलिस उपायुक्त एम. हर्षवर्धन यांनी सांगितले की, “आतापर्यंत 21 बांगलादेशी नागरिकांवर कारवाई करण्यात आली असून, 18 जणांना देशाबाहेर पाठवण्यात आले आहे, तर तीन जणांना अटक केली आहे. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.”
घुसखोरीचा प्रश्न उपस्थित
दरम्यान, देशभरात बेकायदेशीर बांगलादेशी नागरिकांच्या घुसखोरीचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. विविध शहरांमध्ये बांगलादेशी नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर घुसखोरी झाल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस आणि तपास यंत्रणा सतर्क झाले आहेत. विशेषतः मुंबई, नाशिक आणि दिल्लीसह अनेक ठिकाणी पोलिसांनी कारवाई करत बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. आता पोलीस आणि गुप्तचर यंत्रणांकडून या घुसखोरांच्या प्रवेश मार्गांचा आणि त्यांचा कुठल्या गुन्हेगारी किंवा राष्ट्रविरोधी कारवायांमध्ये सहभाग आहे का? याचा तपास केला जात आहे.