पुणे, 06 फेब्रुवारी: पुणे शहरातील सहकारनगर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी धडक कारवाई करत गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतुस बाळगणाऱ्या तरूणाला अटक केली. ऋतिक संजय ननावरे (वय 24, रा. बालाजीनगर, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी तब्बल 63 हजार रुपयांचे गावठी पिस्तूल जप्त केले आहे. अशी माहिती पुणे शहर पोलिसांनी दिली आहे.
घटनेचा तपशील
दि. 3 फेब्रुवारी 2025 रोजी सहकारनगर पोलीस ठाण्याचे तपास पथक गस्त घालीत असताना पोलीस अंमलदार महेश मंडलीक यांना गुप्त माहिती मिळाली की, पवार हॉस्पिटलच्या मागे बजरंग दल चौकाजवळ एक तरूण अर्धवट बांधकाम असलेल्या इमारतीजवळ संशयास्पदरीत्या थांबला असून, त्याने कंबरेला पिस्तूल लावले आहे. यासंदर्भात सहकारनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गौड यांना खात्रीशीर बातमी मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ तपास पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांची टीम तयार केली. त्यांना घटनास्थळी जाऊन कारवाई करण्याचे आदेश दिले.
कारवाई आणि जप्ती
मिळालेल्या माहितीच्या आधारे तपास पथकाने तत्काळ घटनास्थळी छापा टाकत आरोपी ऋतिक ननावरे याला ताब्यात घेतले. त्यावेळी झडती घेतल्यानंतर पोलिसांना त्याच्या पॅन्टमध्ये खोचलेले एक गावठी पिस्तूल व तीन जिवंत काडतूस सापडले. पोलिसांनी ते जप्त केले. सदर जप्त करण्यात आलेल्या या गावठी पिस्तुलाची किंमत 63 हजार रुपये आहे. याप्रकरणी या आरोपीच्या विरोधात सहकारनगर पोलीस ठाण्यात आर्म्स ॲक्ट कलम 3 (25) आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 34 (1) सह 125 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांची यशस्वी कारवाई
सदर कारवाई पुणे शहर अपर पोलीस आयुक्त (पश्चिम विभाग) प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त (परिमंडळ 2) स्मार्तना पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त (स्वारगेट विभाग) राहुल आवारे, तसेच सहकारनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गौड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तसेच या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पाटील, सहा. पोलीस उपनिरीक्षक बापू खुटवड आणि पोलीस अंमलदार महेश मंडलीक, अमोल पवार, किरण कांबळे, बजरंग पवार, चंद्रकांत जाधव, अमित पदमाळे, सागर सुतकर, योगेश ढोले, महेश भगत, खंडू शिंदे यांनी सहभाग घेतला.