सापुतारा, 02 फेब्रुवारी: (विश्वजीत खाटमोडे) गुजरातमध्ये रविवारी (दि.02) सकाळी मोठा बस अपघात झाला आहे. या अपघातात 5 प्रवाशांचा मृत्यू झाला असून, अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. नाशिक-गुजरात महामार्गावर सापुताऱ्यापासून सुमारे 2.5 किमी अंतरावर एक खाजगी बस 20 फूट खोल दरीत कोसळली. अपघातवेळी या बसमध्ये एकूण 48 प्रवासी होते. नाशिक-सुरत महामार्गावरील सापुतारा घाटाजवळ आज पहाटे सव्वा चारच्या सुमारास हा अपघात झाला. याची माहिती पोलीस उपअधीक्षक सुनील पाटील यांनी दिली आहे.
https://x.com/ANI/status/1885921263723696626?t=Tp9uXL8Cmeu9WaISqG_cLQ&s=19
पोलिसांनी दिली माहिती
यूपी पासिंगची ही खाजगी बस होती. ही बस त्र्यंबकेश्वर येथून गुजरातमधील द्वारका शहराकडे जात होती. ही बस भाविकांना देवदर्शनासाठी घेऊन जात होती. सापुतारा हिल स्टेशनजवळ बस चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या अपघातानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी तातडीने बचावकार्य सुरू करण्यात आले. स्थानिक प्रशासन, पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. या अपघातामुळे या बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, असे पोलिसांनी सांगितले.
या अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये 2 महिला आणि 3 पुरुषांचा समावेश आहे. तर यामध्ये 35 जण जखमी झाल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक सुनील पाटील यांनी दिली. जखमींपैकी 17 जणांची प्रकृती गंभीर असल्याचे त्यांनी सांगितले. या अपघातामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. पोलीस प्रशासनाने अपघाताचे कारण शोधण्यासाठी चौकशी सुरू केली आहे.