भरधाव टिप्परने विद्यार्थ्याला चिरडले! अपघाताचा व्हिडिओ समोर

भरधाव टिप्परने बारामतीत विद्यार्थ्याला चिरडले, अपघात स्थळाचा व्हिडिओ समोर.

बारामती, 24 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) बारामती तालुक्यातील तांदुळवाडी येथील कल्याणीनगर मध्ये आज, 24 जानेवारी रोजी एक हृदयद्रावक घटना घडली. एका भरधाव टिप्पर गाडीने 12 वीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्याला चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात मृत्यू पावलेल्या विद्यार्थ्याचे नाव रिजवान झारी असून, तो बारामतीच्या तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात शिक्षण घेत होता. आज दुपारी 2:21 वाजता हा अपघात झाला.

पाहा व्हिडिओ –

 

सदर टिप्पर गाडी अवैध गौणखनिज उत्खननासाठी वापरण्यात येत असल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. अपघात झालेली टिप्पर गाडी परराज्यातील असून ती कोलकाता येथील असल्याची माहिती मिळाली आहे. या टिप्पर गाडीचे पासिंग कोलकाता राज्यातील असल्याचे समजते. त्यामुळे या घटनेने पुन्हा एकदा अवैध वाहतुकीच्या धोकादायक परिणामांवर प्रकाश टाकला आहे.

घटना सीसीटीव्हीत कैद

ही अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. कल्याणीनगर परिसरातील रस्त्यावर आज दुपारच्या सुमारास एक टिप्पर गाडी येत होती. त्याचवेळी रिजवान झारी हा विद्यार्थी समोरून दुचाकीवरून येत होता. परंतु, टिप्पर चालकाने रस्त्याच्या मधोमध आल्यावर अचानकपणे टर्न मारला, त्यामुळे तो विद्यार्थी टिप्पर खाली चिरडला गेला. दुर्दैवाने यात त्याचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताला सदर टिप्पर चालक जबाबदार असून, त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

टिप्पर चालक फरार

दरम्यान, या अपघातानंतर टिप्पर चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. त्याचा सध्या पोलीस शोध घेत आहेत. तर या दुर्घटनेमुळे कल्याणीनगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. रिजवानच्या अचानक जाण्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी अवैध गौणखनिज वाहतुकीविरोधात तीव्र संताप व्यक्त केला असून, संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *