पुणे, 24 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) गेल्या वर्षभरात पुणे शहरात गुन्ह्यांची संख्या कमी झाल्याची माहिती पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे. पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत पुणे पोलीस दलाचा वार्षिक कामगिरी अहवाल सादर केला. या अहवालात गुन्हे, प्रशासन, कायदा-सुव्यवस्था आणि इतर महत्त्वाच्या विषयांवरील आकडेवारी सादर करण्यात आली.
https://x.com/ANI/status/1882393204903039006?t=_mI52xMVvho6KiEQxrjiLQ&s=19
पोलीस आयुक्त काय म्हणाले?
पोलीस आयुक्त म्हणाले की, “पुणे शहरातील गुन्ह्यांच्या प्रमाणात घट झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्टपणे दिसून येत आहे. खुनाच्या गुन्ह्यांमध्ये सुमारे 17 टक्के, तर खुनाचा प्रयत्न करणाऱ्या गुन्ह्यांमध्ये सुमारे 33 टक्के घट झाली आहे. ही घट काही योगायोगाने झालेली नसून, पुणे पोलिसांनी गेल्या वर्षभरात घेतलेल्या कठोर व्यावसायिक उपाययोजनांमुळे साध्य झाली आहे. गुन्हेगारीतील घट समाधानकारक असली तरी आम्ही पूर्णपणे समाधानी नाही आणि आम्ही आणखी कठोर पावले उचलत आहोत. डिसेंबर 2025 पर्यंत पुणे शहरातील परिस्थिती आणखी सुधारलेली दिसेल, असा आम्हाला विश्वास आहे.”
बेकायदेशीर स्थलांतरितांविरोधात कठोर कारवाई
बेकायदेशीर स्थलांतरितांविरोधात पुणे पोलिसांनी विशेष मोहिम राबवली आहे. गेल्या वर्षी 53 बेकायदेशीर परदेशी नागरिकांना देशातून बाहेर पाठवण्यात आले. या संदर्भात बोलताना पोलीस आयुक्त म्हणाले, “देशात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या परदेशी नागरिकांना ओळखून त्यांच्यावर तत्काळ कारवाई करण्याचे निर्देश सर्व पोलीस ठाण्यांना देण्यात आले आहेत. बांगलादेशी नागरिकांविरोधात गुप्तचर यंत्रणा सक्रिय करण्यात आली असून, त्यांना शोधून कारवाई केली जात आहे. याशिवाय, आधार कार्ड, पासपोर्ट यांसारखी बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्यांविरोधातही विशेष मोहिम राबवली जात आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, पुणे पोलिसांच्या या कडक पावलांमुळे नागरिकांच्या सुरक्षेला आणखी बळकटी मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.