मुंबई, 23 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) बॉलिवूड कलाकारांना पुन्हा एकदा जीवे धमक्या मिळाल्याचा प्रकार समोर आला आहे. अभिनेता राजपाल यादव यांना पाकिस्तानमधून धमकीचा ईमेल आला आहे. ईमेल पाठवणाऱ्यांनी स्वतःला बिश्नोई गटाचे सदस्य सांगितले आहे. या ईमेल मधून त्यांनी राजपाल यादव यांना कॉमेडियन कपिल शर्मा याला मृत्यूची धमकी देण्यास सांगितले आहे. या घटनेमुळे बॉलिवूड विश्वात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. या घटनेचा तपास सध्या मुंबई पोलीस करीत आहेत.
https://x.com/ANI/status/1882338835398566374?t=EVbMt-6qXOBCeWrVjrH5xQ&s=19
पोलिसांनी दिली माहिती
याबाबत अंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सदाशिव निकम यांनी सांगितले की, “अभिनेता राजपाल यादव यांच्या टीमला पाकिस्तानमधून ईमेल आला आहे. आयपी ॲड्रेस पाकिस्तानचा आहे. त्यांनी स्वतःची ओळख बिश्नोई गटाचे सदस्य म्हणून दिली आहे. या ईमेल मध्ये राजपाल यादव यांना कपिल शर्माला मृत्यूची धमकी देण्यास सांगितले आहे. तसेच त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात असल्याचे देखील या धमकीच्या ईमेलमध्ये म्हटले आहे. त्याचबरोबर सिधू मूसेवाला आणि बाबा सिद्दीकी यांचे फोटो देखील ईमेलसह जोडलेले होते. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे, असे सदाशिव निकम यांनी सांगितले.
बॉलिवूडमध्ये भीतीचे वातावरण
या प्रकरणामुळे राजपाल यादव आणि कपिल शर्माच्या कुटुंबीयांमध्ये घबराट पसरली आहे. त्यामुळे बॉलिवूड कलाकारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे. अलीकडच्या काळात सलमान खान, शाहरूख खान यांसारख्या बड्या कलाकारांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. तसेच पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला आणि राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी यांच्या हत्या झाल्या आहेत. तर काही दिवसांपूर्वीच अभिनेता सैफ अली खानवर हल्ला करण्यात आला होता. अशातच राजपाल यादव आणि कपिल शर्मा यांना धमक्या मिळाल्याने बॉलिवूडमध्ये सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर, पोलीस प्रशासन सतर्क झाले असून, या प्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.