जळगाव, 22 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) जळगाव रेल्वे अपघातात मृतांची संख्या 13 वर पोहोचली असल्याची माहिती जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी गुरूवारी (दि.23) सकाळी एएनआय वृत्तसंस्थेला दिली आहे. बुधवारी (दि.22) संध्याकाळी ही दुर्घटना घडली. पुष्पक एक्सप्रेसच्या काही प्रवाशांनी ट्रेनमध्ये लागलेल्या आगीच्या अफवेमुळे रेल्वेतून बाहेर उड्या मारल्या. त्याचवेळी शेजारच्या मार्गावरून कर्नाटक एक्सप्रेस जात होती. त्या रेल्वेने पुष्पक एक्सप्रेसच्या काही प्रवाशांना धडक दिली.
https://x.com/ani_digital/status/1882271239563247832?t=_pRiS8kmAYxnZE0o_RAyeg&s=19
जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू
जळगाव जिल्ह्यातील रेल्वे अपघातात आतापर्यंत 13 जणांना आपला जीव गमावला लागला आहे. तर यामध्ये काही प्रवासी जखमी झाले आहेत. अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींना तातडीने जळगाव सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जखमींच्या प्रकृतीकडे प्रशासनाचे लक्ष आहे.
रेल्वे मंत्रालयाकडून आर्थिक मदत जाहीर
रेल्वे मंत्रालयाने जळगाव रेल्वे अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 1.5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. तसेच गंभीर जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपये रुपये आणि किरकोळ जखमींना 5 हजार रुपयांची मदत रेल्वे मंत्रालयाने जाहीर केली आहे, असे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या कार्यालयाने निवेदनात म्हटले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी दिली माहिती
जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी एएनआयला सांगितले, “अपघाताची माहिती मिळताच प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू केले. घटनास्थळी रुग्णवाहिका आणि इतर मदत पाठवण्यात आली. तसेच जखमींवर उपचार करण्यासाठी रुग्णालये तयारीत ठेवण्यात आली. जखमींवर सध्या जळगाव जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत आणि मृतांचे शवविच्छेदन करण्यात येत आहे. या घटनेचा सखोल तपास सुरू आहे.”
पंतप्रधानांकडून शोक व्यक्त
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्दैवी घटनेबाबत दु:ख व्यक्त केले आहे. “जळगावातील या दु:खद अपघाताने व्यथित झालो आहे. मृतांच्या कुटुंबीयांना मी माझ्या मनःपूर्वक संवेदना व्यक्त करतो आणि जखमींच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो. प्रशासनाने सर्वतोपरी मदत उपलब्ध करून दिली आहे,” असे ट्विट पंतप्रधान कार्यालयाने ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केले आहे.
राज्य सरकारकडून आर्थिक मदत जाहीर
यासोबतच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून प्रत्येकी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. तसेच राज्य सरकार जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च उचलणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. तसेच जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे.