कोलकाता, 22 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर बुधवारी (दि.22) झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यात भारताने इंग्लंडचा सात गडी राखून पराभव करत 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. सलामीवीर अभिषेक शर्माच्या झंझावाती खेळीने भारताला सहज विजय मिळवून दिला. अभिषेक शर्माच्या शानदार 79 धावांच्या खेळीमुळे भारताने पहिला सामना सहज जिंकला आणि मालिकेत भारताला विजयी सुरूवात करून दिली.
https://x.com/BCCI/status/1882105003919487167?t=dNRsqXRHFMUdRYu84y_ESA&s=19
वरूण चक्रवर्तीच्या 3 विकेट
या सामन्यात इंग्लंडने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत केवळ 132 धावा केल्या. त्यावेळी इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने 44 चेंडूत 68 धावांची झुंजार खेळी करत संघाला 132 पर्यंतची सन्मानजनक धावसंख्या गाठून दिली. मात्र, या सामन्यात इंग्लंडचे इतर फलंदाज अपयशी ठरले. त्याचा फटका इंग्लंड संघाला बसला. भारताकडून फिरकीपटू वरूण चक्रवर्तीने 3 विकेट घेत इंग्लंडचा डाव गुंडाळला. त्याला अर्शदीप सिंग, हार्दिक पंड्या, आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेत उत्कृष्ट साथ दिली.
अभिषेक शर्माची झुंझार खेळी
132 धावांच्या पाठलागासाठी मैदानात उतरलेल्या भारताला संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांनी 41 धावांची ठोस सुरुवात दिली. संजू सॅमसन (26) बाद झाल्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव खाते न उघडताच बाद झाला. मात्र, अभिषेक शर्माने आपल्या आक्रमक खेळीने इंग्लंडच्या गोलंदाजांवर दबाव टाकत फक्त 20 चेंडूत अर्धशतक झळकावले. त्याने 34 चेंडूत 79 धावा फटकावत 5 चौकार आणि 8 षटकारांची आतषबाजी केली. अखेर, तिलक वर्मा (19) आणि हार्दिक पंड्या (3) यांनी नाबाद राहून विजयाची औपचारिकता पूर्ण केली. भारताने 12.5 षटकांत 3 गड्यांच्या मोबदल्यात 133 धावा करत सामना जिंकला. गोलंदाजीत इंग्लंडकडून जोफ्रा आर्चरने दोन, तर आदिल रशीदने एक गडी बाद केला.