जळगाव, 22 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) जळगाव जिल्ह्यातील पाचोरा जवळ घडलेल्या दुर्दैवी रेल्वे अपघाताबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटद्वारे दु:ख व्यक्त केले आहे. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारच्या वतीने मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. या घटनेत काही लोकांचा मृत्यू झाला असून, मुख्यमंत्र्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. या ठिकाणी तत्काळ मदतकार्य करण्यासाठी त्यांच्या मंत्री गिरीश महाजन आणि पोलिस अधीक्षक घटनास्थळी पोहोचले आहेत. तसेच जिल्हाधिकारीही लवकरच तिथे पोहोचणार असल्याचे देवेंद्र फडणवीसांनी यामधून सांगितले आहे.
https://x.com/Dev_Fadnavis/status/1882063193864069360?t=n5LV22s3foVI1mBaMawh9g&s=19
प्रशासनाचे परिस्थितीवर लक्ष: मुख्यमंत्री
रेल्वे प्रशासनाच्या समन्वयाने संपूर्ण जिल्हा प्रशासन मदतकार्य राबवित आहे. जखमींना उपचार मिळण्यासाठी 8 रुग्णवाहिका घटनास्थळी पाठविण्यात आल्या आहेत. जखमींवर उपचार करण्यासाठी सामान्य रुग्णालय तसेच जवळच्या खासगी रुग्णालयांना तयार ठेवण्यात आले आहे. आपत्कालीन उपकरणे जसे की काच कापणारे यंत्र, फ्लडलाईट्स यांसारख्या आपत्कालीन सुविधा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे. दरम्यान, जळगाव जिल्ह्यातील या अपघाताच्या परिस्थितीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे बारकाईने लक्ष आहे. सर्व प्रकारची मदत तत्काळ पुरवली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाच्या सतत संपर्कात असल्याचे या ट्विटमधून सांगितले आहे.
देवेंद्र फडणवीस यांचे ट्विट
“जळगाव जिल्ह्यातील पाचोरा नजीक एका अत्यंत दुर्दैवी घटनेत काही लोकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय वेदनादायी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. माझे सहकारी मंत्री गिरीश महाजन तसेच पोलिस अधीक्षक हे घटनास्थळी पोहोचले असून, जिल्हाधिकारी काही वेळात तेथे पोहोचत आहेत. संपूर्ण जिल्हा प्रशासन रेल्वे प्रशासनाशी समन्वयाने काम करीत असून, जखमींच्या उपचारासाठी तातडीने व्यवस्था करण्यात येत आहेत. 8 रुग्णवाहिका रवाना करण्यात आल्या आहेत. सामान्य रुग्णालय तसेच नजीकच्या इतर खाजगी रुग्णालयांना जखमींवर उपचारासाठी सज्ज ठेवण्यात आले आहे. ग्लासकटर, फ्लडलाईट्स इत्यादी आपातकालिन यंत्रणा सुद्धा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. संपूर्ण स्थितीवर आम्ही लक्ष ठेऊन असून, आवश्यक ती सर्व मदत तातडीने पुरविण्यात येत आहे. मी जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात आहे,” असे ट्विट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
5 लाखांची आर्थिक मदत जाहीर
“जळगाव जिल्ह्यातील दुर्दैवी अपघातातील मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक सहाय्य राज्य सरकारतर्फे करण्यात येईल आणि जखमींचा संपूर्ण खर्च सुद्धा राज्य सरकार करेल. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो,” असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
https://x.com/PTI_News/status/1882048693001748850?t=jjFOBptrcGwQOXO_71xISQ&s=19
जळगाव जिल्ह्यात रेल्वे अपघात
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा स्थानकाजवळ आज (दि.22) दुपारच्या सुमारास रेल्वे अपघात घडला. ट्रेनमध्ये आग लागल्याच्या अफवेवर विश्वास ठेवून पुष्पक एक्स्प्रेस मधील प्रवाशांनी आपल्या डब्यातून बाहेर उड्या मारल्या. यादरम्यान दुसऱ्या बाजूने भरधाव वेगात असलेल्या बंगळुरू एक्सप्रेसने या प्रवाशांना उडवले. या घटनेत 6 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 7 ते 8 जण जखमी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या अपघातानंतर रेल्वे अधिकारी, पोलीस आणि इतर कर्मचारी घटनास्थळी पोहोचले असून बचावकार्य सुरू आहे.