मुंबई, 20 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटर प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने पाच पोलीस कर्मचाऱ्यांना जबाबदार धरले आहे. याप्रकरणी या पोलीस कर्मचाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश मुंबई कोर्टाने दिले आहेत. या प्रकरणाच्या तपासाचा अहवाल मेट्रोपॉलिटन दंडाधिकाऱ्यांनी सोमवारी (दि.20) मुंबई उच्च न्यायालयात सादर केला होता. त्यावेळी न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवले.
https://x.com/barandbench/status/1881230670808433099?t=YHGabBANhzHqxQpO7TEulA&s=19
आरोपीच्या वडिलांकडून याचिका दाखल
23 सप्टेंबर रोजी अक्षय शिंदे पोलिसांच्या एन्काऊंटरमध्ये ठार झाला होता. या एन्काऊंटरच्या विरोधात आरोपी अक्षय शिंदे याचे वडील अण्णा शिंदे यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. आपल्या मुलाला पोलिसांनी बनावट एन्काऊंटरमध्ये मारले, असा आरोप त्याचे वडील अण्णा शिंदे यांनी या याचिकेत केला होता. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू होती.
चौकशी अहवालात पोलीस दोषी
या याचिकेच्या सुनावणीदरम्यान मेट्रोपॉलिटन दंडाधिकाऱ्यांनी आज आपला चौकशी अहवाल आज बंद लिफाफ्यात मुंबई उच्च न्यायालयात सादर केला. या तपास अहवालामध्ये आरोपी अक्षयच्या मृत्यूस पाच पोलिसांना जबाबदार धरण्यात आले. त्यामुळे अक्षय शिंदेचा मृत्यू संशयास्पद असल्याचे नमूद करत मुंबई उच्च न्यायालयाने पाच पोलीस कर्मचाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे या पोलिसांच्या विरोधात आता गुन्हा नोंदविण्यात येणार आहे.
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण
दरम्यान, ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील एका शाळेच्या बाथरूममध्ये दोन चिमुरड्या मुलींचे लैंगिक शोषण केल्याचे प्रकरण 16 ऑगस्ट 2024 रोजी उघडकीस आले होते. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी अक्षय शिंदे याच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला पॉक्सो कायद्यांतर्गत अटक केली होती. 23 ऑगस्ट 2024 रोजी पोलीस आरोपी अक्षय शिंदेला तळोजा कारागृहातून ट्रान्झिट रिमांडसाठी घेऊन जात होते, त्यावेळी पोलिसांनी अक्षय शिंदेंचा एन्काऊंटर केला. दरम्यान, ट्रान्झिट रिमांडसाठी घेऊन जात असताना अक्षय शिंदे याने पोलिसांच्या गाडीतून बंदूक हिसकावून घेतली आणि त्यानंतर त्याने पोलिसांवर काही राऊंड गोळीबार केला. त्यावेळी पोलिसांनी देखील स्वतःच्या रक्षणासाठी प्रत्युत्तरात गोळीबार केला, असा दावा पोलिसांनी केला होता.