मुंबई, 07 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) अभिनेता सैफ अली खान याच्यावरील हल्ल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव मोहम्मद शरीफुल इस्लाम शेझाद असून तो 30 वर्षांचा आहे. हा व्यक्ती बांगलादेशी नागरिक असल्याचा पोलिसांचा संशय आहे. या आरोपीला आता न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. त्यावेळी तपासासाठी पोलिस कोठडीची विनंती करतील, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, या हल्लेखोराचा सैफ अली खान वरील हल्ल्यामागे कोणता उद्देश होता? हे पोलीस तपासानंतरच पुढे येणार आहे.
https://x.com/PTI_News/status/1880827386574610470?t=N44WGArNOal9n5oT8kh9mw&s=19
पोलिसांनी काय म्हटले?
यासंदर्भात मुंबई पोलिसांच्या झोन-9 चे उपायुक्त दिक्षितकुमार अशोक गेडाम यांनी अधिक माहिती दिली आहे. “ही घटना 16 जानेवारी 2024 रोजी घडली. अभिनेता सैफ अली खान यांच्या निवासस्थानी एक व्यक्ती चोरीच्या हेतूने घुसला. यादरम्यान त्याने सैफ अली खानवर धारधार शस्त्राने हल्ला केला. याप्रकरणात एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. या आरोपीचे नाव मोहम्मद शरीफुल इस्लाम शेझाद असून तो 30 वर्षांचा आहे. या आरोपीला न्यायालयात आता हजर करण्यात येईल. आम्ही पोलिस कोठडीची विनंती करू. आम्हाला असा संशय आहे की आरोपी बांगलादेशी आहे, त्यामुळे योग्य कलमे लावण्यात आली आहेत,” असे त्यांनी सांगितले.
आरोपीकडे वैध कागदपत्रे नाहीत
याप्रकरणाचा मुंबई पोलिसांनी तपास सुरू केला आहे. अटक करण्यात आलेल्या या आरोपीकडे वैध भारतीय कागदपत्रे नाहीत. प्राथमिक तपासात तो बांगलादेशी असल्याचे दिसून येत आहे. तपासात असेही उघड झाले की, त्याने आपले नाव बदलून विजय दास असे केले होते. या नावाने तो गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून मुंबईत वास्तव्य करत होता. त्यानंतर तो मुंबईच्या आसपासच्या परिसरात राहत होता. 15 दिवसांपूर्वी तो पुन्हा मुंबईत परतला होता. पोलिसांनी सांगितले की, या आरोपीने चोरीसाठी सैफ अली खानच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी हल्ला झाला. तर सैफ खान खान वरील हल्ल्याचा तपास सुरू आहे.