पुणे, 17 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) पुणे जिल्ह्यातील नारायणगाव परिसरात आज (दि.17) सकाळी भीषण अपघात झाला. त्यावेळी पुणे-नाशिक महामार्गावर आयशर टेम्पोने मक्झिमो गाडीला पाठीमागून धडक दिली. त्यानंतर मक्झिमो गाडी रस्त्यावर ठेवलेल्या एसटी बसला धडकली. या अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघाताबद्दल शोक व्यक्त करून मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. तसेच त्यांनी जखमींच्या उपचारांकडे लक्ष देण्याच्या सुचना सबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
https://x.com/Dev_Fadnavis/status/1880152051268665773?t=kgdhB0T4tRURq1c-tARHuA&s=19
मुख्यमंत्र्यांचे ट्विट –
याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर पोस्ट शेयर केली आहे. पुणे-नाशिक महामार्गावर नारायणगाव जवळ झालेल्या भीषण अपघातात 9 कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना करतो, असे त्यांनी यात म्हटले आहे. तसेच मृतांच्या वारसांना 5 लाख रुपये आर्थिक सहाय्य मुख्यमंत्री सहायता निधीतून करण्यात येईल. जखमींच्या उपचाराची योग्य काळजी घ्या, अशा सूचना पुणे पोलिस अधीक्षकांना दिल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
https://x.com/ANI/status/1880185046369497352?t=zCS_d87jBJhQRiUPqit3hg&s=19
टेम्पो चालक फरार
पुणे-नाशिक महामार्गावर नारायणगाव परिसरात आज (दि.17) आयशर टेम्पो, मक्झिमो गाडी आणि एसटी बस यांच्यात विचित्र अपघात झाला. त्यावेळी आयशर टेम्पोने मक्झिमो गाडीला पाठीमागून धडक दिली आहे. या धडकेने मक्झिमो गाडी रस्त्यावर थांबलेल्या एसटी बसवर आदळली. या अपघातात 9 जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये 4 महिला, 4 पुरुष आणि एक 5 वर्षांचे बालक यांचा समावेश आहे. या अपघातात 7 जण जखमी झाले आहेत आणि त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक लोक घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी त्यांनी बचावकार्य करून जखमींना तातडीने जवळील रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, या अपघातानंतर टेम्पो चालक फरार झाला असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत. पोलिसांना त्याच्या गाडी मालकाची माहिती मिळाली आहे. पोलिसांनी त्याचा टेम्पो जप्त केला आहे.