कृषिक प्रदर्शनात काळ्या मिरचीचे प्रात्यक्षिक सादर

कृषिक प्रदर्शनात काळ्या मिरचीचे प्रात्यक्षिक

बारामती, 16 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) बारामतीच्या माळेगाव खुर्द येथील अ‍ॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्र येथे ‘कृषिक 2025’ या भव्य कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन 16 ते 20 जानेवारी 2025 दरम्यान सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. या कृषी प्रदर्शनात शेतकऱ्यांना शेतीविषयक अत्याधुनिक तंत्रज्ञान, नवीनतम पिकांचे वाण, खत व्यवस्थापन आणि आधुनिक शेतीच्या पद्धतींबद्दल सखोल माहिती मिळेल.

काळ्या मिरचीचे प्रात्यक्षिक

विशेषतः या कृषी प्रदर्शनात काळ्या मिरचीच्या लागवडीची व उत्पादनाची प्रात्यक्षिके सादर केली जात आहेत. बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रात यंदा काळ्या मिरचीची लागवड करण्याचा प्रयोग करण्यात आला आहे. दरम्यान, ही काळी मिरची इतर हिरव्या मिरच्यांपेक्षा खूपच तिखट असते. तसेच तापमान वाढल्यानंतर देखील याला इतर मिरचीच्या तुलनेत किड लागण्याचा धोका कमी असतो. यामुळे, उन्हाळ्यात देखील या मिरचीचे उत्पादन टिकून राहते. त्यामुळे देखरेख करण्याचा शेतकऱ्यांचा त्रास कमी होतो आणि रासायनिक कीटकनाशकांची बचत होते. काळ्या मिरचीचे उत्पादन शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरते, कारण त्यांना दीर्घकाळ टिकणारे आणि अधिक नफा देणारे उत्पादन मिळवता येते. बारामतीच्या कृषिक 2025 या प्रदर्शनात काळ्या मिरचीच्या उत्पादन प्रक्रियेची माहिती शेतकऱ्यांना दिली जाईल. तसेच त्यांना या पिकाच्या लागवडीसाठी आवश्यक असलेले ज्ञान मिळेल.

नवीन तंत्रज्ञानाची माहिती मिळणार 

त्याचबरोबर या कृषी प्रदर्शनात शेतकऱ्यांना केवळ शेतीतील नवनवीन शोध आणि तंत्रज्ञानाची ओळख होणार नाही, तर त्यांना विविध प्रकारच्या बियाण्यांचे प्रदर्शन, फुलशेती, भाजीपाला, फळभाज्या, फळे, भरडधान्य आणि इतर पिकांचे प्रात्यक्षिके देखील पाहता येणार आहेत. शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचे फायदे, तसेच विविध पिकांतील नवीनतम वाणांची माहिती मिळवण्याची संधी मिळणार आहे.

कृषिक 2025 प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सर्वसमावेशक माहिती मिळणार आहे. शेतकऱ्यांना शेतीतील प्रगतीशील तंत्रज्ञान, नव्या पिकांच्या वाणांपासून ते सेंद्रिय शेतीपर्यंत, प्रत्येक गोष्टीची माहिती मिळवण्याची सुवर्णसंधी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त या प्रदर्शनाला भेट द्यावी, त्यात सहभागी होऊन शेतीतील नवीनतम व नविनतम तंत्रज्ञानाची ओळख करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *