बारामतीत ‘कृषिक 2025’ प्रदर्शनाला आजपासून सुरूवात

बारामती, 16 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) अ‍ॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित कृषी विज्ञान केंद्रामार्फत बारामतीच्या शारदानगर येथे आयोजित ‘कृषिक 2025’ या भव्य कृषी प्रदर्शनाला आजपासून (दि.16) प्रारंभ झाला. या प्रदर्शनाचे उद्घाटन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आणि पशुसंवर्धनमंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत पार पडले. विशेष म्हणजे, या कार्यक्रमाच्या निमित्ताने शरद पवार आणि अजित पवार हे नेते एकाच मंचावर उपस्थित होते.

https://x.com/RRPSpeaks/status/1879762619848134695?t=zn8os7jqA_kfGpyNNZaj-Q&s=19

प्रदर्शनाचा कालावधी व जागा

‘कृषिक 2025’ प्रदर्शन 16 ते 20 जानेवारी या कालावधीत चालणार असून, हे प्रदर्शन बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्र येथे तब्बल 170 एकर जागेवर भरविण्यात आले आहे. यामध्ये आधुनिक शेती, तंत्रज्ञान, तसेच पशुपालनविषयक नवकल्पना यांचे विस्तृत प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. प्रदर्शनात उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे, पशुसंवर्धनमंत्री पंकजा मुंडे आणि इतर मान्यवरांनी भविष्यातील शेती आणि तंत्रज्ञानाच्या प्रगत साधनांची माहिती घेतली. या प्रदर्शनात देशभरातून आलेल्या शेतकरी व तंत्रज्ञांचा मोठा सहभाग असणार आहे. प्रदर्शनाच्या माध्यमातून नवीन युगातील शेतीविषयक कल्पनांना चालना मिळणार आहे.

प्रात्यक्षिके, नवकल्पना, तज्ज्ञांचे मार्गदर्शन

या प्रदर्शनात भविष्यातील शेतीला गती देणारे अनेक नावीन्यपूर्ण प्रकल्प व आधुनिक तंत्रज्ञानाचे सादरीकरण करण्यात आले आहे. प्रमुख आकर्षणांमध्ये एआय तंत्रज्ञान, हरितगृह शेती, ड्रोन तंत्रज्ञान, जलसंवर्धन तंत्र, सेंद्रिय व नैसर्गिक शेतीचे मॉडेल्स, तसेच पशुसंवर्धनविषयक तंत्रज्ञान यांचा समावेश आहे. या पाच दिवसीय प्रदर्शनादरम्यान विविध तज्ज्ञ व संशोधक शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन करणार आहेत. शेतीतील नवनवीन प्रयोग, कीड व्यवस्थापन, माती परीक्षण, पाणी बचत, तसेच कृषी प्रक्रिया उद्योग उभारणी यांची माहिती मिळणार आहे. ‘कृषिक 2025’ प्रदर्शनात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने उत्पादन वाढवलेला ऊस, आधुनिक फळझाडांची लागवड, परदेशी पिकांची प्रात्यक्षिके, विविध प्रकारची फुलशेती आणि दर्जेदार बियाण्यांची प्रात्यक्षिके पाहायला मिळणार आहेत. शेतकऱ्यांसाठी हे प्रदर्शन अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

शेतकऱ्यांचा सहभाग आणि आवाहन

पहिल्या दिवशी देशभरातून आलेले शेतकरी, तज्ज्ञ, संशोधक आणि उद्योग प्रतिनिधी यांनी या प्रदर्शनात सहभाग घेतला आहे. ‘कृषिक 2025’ प्रदर्शन हे देशातील शेतकऱ्यांसाठी नव्या संधींचा शोध घेणारे आणि आधुनिक तंत्रज्ञान व तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाची संधी देणारे व्यासपीठ ठरणार आहे. शेतकरी आणि नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट देऊन याचा लाभ घ्यावा, असे आयोजकांनी आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *