बीड, 15 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आरोपी वाल्मिक कराडला बीड जिल्हा न्यायालयाने 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार, वाल्मिक कराडला पोलिसांच्या विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) ताब्यात देण्यात आले आहे. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचा सहभाग आहे का? याचा तपास आता एसआयटी पथक करणार आहे. त्यामुळे त्यांच्या चौकशीतून कोणती नवी माहिती समोर येणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
https://x.com/PTI_News/status/1879508091114508321?t=Hop2vPlfsReLyMwHdCQbpw&s=19
दरम्यान, संतोष देशमुख यांच्या हत्येच्या काही दिवसांनी वाल्मिक कराडला खंडणी प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्यानंतर, संतोष देशमुख यांचे कुटुंबीय आणि विविध राजकीय पक्षांकडून वाल्मिक कराडवर मकोका लावण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार, वाल्मिक कराड विरोधात मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. दरम्यान, मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा सर्वत्र निषेध केला जात आहे. या प्रकरणावरून बीड जिल्ह्यात सध्या संतापाची लाट आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंत 7 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर एक आरोपी अद्याप फरार आहे. या आरोपीला तत्काळ अटक करण्याची मागणी केली जात आहे. परंतु या फरार आरोपीला पकडण्यास पोलिसांना अपयश आले आहे.
https://x.com/PTI_News/status/1879469377197953160?t=BdYGyiDm6xpmUBEpXIxRuQ&s=19
वाल्मिक कराड समर्थकांकडून निदर्शने
पीटीआयच्या वृत्तानुसार, वाल्मिक कराडला बुधवारी (दि.15) बीड येथील न्यायालयात हजर करण्यात आले. त्याचवेळी वाल्मिक कराडच्या सुटकेसाठी त्याचे समर्थक दुसऱ्या दिवशीही आंदोलन करत होते. त्याच्या समर्थकांनी आजही वाल्मिक कराडच्या सुटकेसाठी निदर्शने केली. यावेळी त्यांनी न्यायालयाबाहेर राडा घातला आणि घोषणाबाजी केली. वाल्मिक कराडवरील खोटे गुन्हे मागे घ्या, अशी मागणी त्यांनी केली. त्याचबरोबर, बीड शहरात आज बंद पाळण्यात आला होता. दरम्यान, बीड जिल्ह्यातील सध्याची तणावाची परिस्थिती लक्षात घेता प्रशासनाने बीड जिल्ह्यात 28 जानेवारीपर्यंत जमावबंदी लागू केलेली आहे. तसेच कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी बीड जिल्ह्यात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.