पुणे, 15 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) पुणे शहर गुन्हे शाखेच्या युनिट 6 पथकाने गंभीर दुखापत आणि जबरी चोरीप्रकरणी दोन महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला अटक केली आहे. रोहित ऊर्फ नरेश अवधुत (वय 30 वर्षे, रा. रामवाडी, सिद्धार्थनगर, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. विमाननगर पोलीस ठाण्यात त्याच्यावर भा.दं.वि. कलम 118(2), 189(2), 191(2), 191(3), 190 आणि 304 अंतर्गत गुन्हा दाखल होता.
हा आरोपी शहरातील विविध भागांत गंभीर दुखापत आणि जबरी चोरीच्या गुन्ह्यांमध्ये सामील होता. 14 जानेवारी रोजी पोलीस निरीक्षक वाहिद पठाण यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथक गस्त घालत असताना पोलीस अंमलदार नितीन मुंढे यांना माहिती मिळाली की, हा आरोपी कल्याणीनगर येथील सिल्वर ओक सोसायटी येथे येणार आहे.
सापळा रचून आरोपीला अटक
याबाबतची माहिती मिळताच पोलिसांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवून घटनास्थळी सापळा रचला. काही वेळात आरोपी तेथे आल्याचे दिसले. पोलिसांनी त्याला चातुर्याने पकडले. चौकशीदरम्यान त्याने आपले नाव रोहित ऊर्फ नरेश उत्तम अवधुत असल्याचे सांगितले. पोलिसांच्या तपासात तो गुन्ह्यातील फरार आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला अटक करून विमाननगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले.
वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन
ही कामगिरी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कारवाईत अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे 2) राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट 6 चे पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, पोलीस उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी, पोलीस हवालदार रमेश मेमाणे, बाळासाहेब सकटे, कानिफनाथ कारखेले, नितीन मुंढे, सुहास तांबेकर, पोलीस अंमलदार ऋषिकेश ताकवणे, सचिन पवार, ऋषीकेश व्यवहारे, बाळासाहेब तनपुरे, समीर पिलाणे आणि महिला पोलीस अंमलदार प्रतीक्षा पानसरे यांनी सहभाग घेतला.