दिल्ली, 15 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) माजी आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर यांनी दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान देत सर्वोच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी याचिका दाखल केली आहे. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने पूजा खेडकर यांच्याविरुद्ध कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे आदेश दिले आहेत. यासंदर्भात आज (दि.15) सुनावणी झाली. दरम्यान, दिल्ली उच्च न्यायालयाने त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जाला नकार दिला होता. त्या निर्णयाविरोधात खेडकर यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
https://x.com/ANI/status/1879432844352852054?t=72BlrNPPZr3-iYAco-E6FQ&s=19
या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली सरकारला नोटीस पाठवली आहे. तर या खटल्याची पुढील सुनावणी 14 फेब्रुवारी रोजी ठेवली आहे. तोपर्यंत खेडकर यांच्यावर कोणतीही कठोर कारवाई होणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे पूजा खेडकर यांना सध्यातरी अटकेपासून दिलासा मिळाला आहे. खेडकर यांच्यावर संघ लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी ओबीसी आणि बेंचमार्क अपंग व्यक्तींसाठी असलेल्या आरक्षणाचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पूजा खेडकर यांना अटकही होऊ शकते. या पार्श्वभूमीवर, पूजा खेडकर यांनी आता सर्वोच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली होती.
अटकेपासून संरक्षण देण्याची मागणी
खेडकर यांनी न्यायालयात म्हटले की, त्यांच्याविरूद्ध दाखल करण्यात आलेल्या तक्रारीतील आरोपांसाठी पुरावे आधीच सरकारकडे उपलब्ध आहेत, त्यामुळे त्यांना कोठडीत ठेवून चौकशी करण्याची गरज नाही. यावेळी त्यांनी असा ही युक्तिवाद केला की, त्या बेंचमार्क अपंगत्व असलेल्या अविवाहित महिला आहेत, ज्यांची नियुक्ती अखिल भारतीय सेवांमध्ये शारीरिक पडताळणीनंतर करण्यात आली होती. त्यामुळे त्यांना अखिल भारतीय सेवा कायद्यानुसार संरक्षण मिळते. तसेच, अपंग व्यक्तींच्या हक्क कायद्यांतर्गतही संरक्षण मिळावे, असा त्यांचा दावा आहे.
पूजा खेडकर यांच्यावर कारवाई
यूपीएससी च्या तक्रारीनुसार, खेडकर यांनी ओबीसी आणि अपंग व्यक्तींच्या कोट्याचा लाभ मिळवण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार केली. त्यांच्यावर असा आरोप आहे की, त्या या आरक्षणासाठी पात्र नसतानाही त्यांनी फसवणूक करून हा लाभ घेतला. हे प्रकरण समोर आल्यानंतर यूपीएससी ने पूजा खेडकर यांची निवड रद्द केली आणि नागरी सेवा परीक्षा-2022 च्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल त्यांना भविष्यातील सर्व परीक्षा आणि निवडीतून कायमचे अपात्र ठरवले.
दिल्ली पोलिसांत गुन्हा दाखल
लोकसेवा आयोगाच्या तक्रारीनुसार पूजा खेडकर यांनी बनावट कागदपत्रांचा वापर करून ओबीसी आणि अपंग व्यक्ती कोट्याचा लाभ घेतला होता. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. यानंतर पूजा खेडकर यांनी सुरुवातीला अटकपूर्व जामिनासाठी दिल्ली उच्च न्यायालयात अर्ज केला होता. उच्च न्यायालयाने त्यांना 12 ऑगस्ट 2024 रोजी काही काळासाठी संरक्षण दिले. मात्र, 23 डिसेंबर 2024 रोजी उच्च न्यायालयाने हे संरक्षण रद्द केले. न्यायालयाच्या या निर्णयाच्या विरोधात पूजा खेडकर यांनी आता सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.