बीड, 12 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील 8 आरोपींवर कठोर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर एक आरोपी अद्याप फरार आहे. सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, जयराम चाटे, विष्णू चाटे, सिद्धार्थ सोनवणे, महेश केदार आणि प्रतीक घुले अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर एक आरोपी कृष्णा आंधळे फरार आहे. त्याचा सध्या पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. या सर्वांवर आता मकोका अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
https://x.com/PTI_News/status/1878086686225129522?t=Ty0yKwlnA9NnksJ1ln3a6w&s=19
वाल्मिक कराडवर ही मकोका लावण्याची मागणी
त्याचबरोबर, याप्रकरणात वाल्मिक कराड यालाही पोलिसांनी अटक केली आहे. मात्र, खंडणीच्या आरोपाखाली त्याच्यावर कारवाई केली जात आहे. त्याच्यावर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल झाला नाही. त्यामुळे वाल्मिक कराडवर खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सध्या राज्यातील विविध राजकीय पक्षांकडून होत आहे. दरम्यान, संतोष देशमुख खून प्रकरणामुळे बीड जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभरात खळबळ उडाली आहे. संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी राज्यभरात ठिकठिकाणी निदर्शने केली जात आहेत.
बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण
बीडमधील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांचे 9 डिसेंबर रोजी अपहरण करून त्यांची अमानुष छळ करत हत्या करण्यात आली होती. प्राथमिक तपासात, पवनचक्की प्रकल्प चालवणाऱ्या कंपनीत खंडणी प्रकरण थांबवण्याचा प्रयत्न केल्यामुळे संतोष देशमुख यांची हत्या झाल्याचे समोर आले आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत सात आरोपींना अटक केली असून, एक आरोपी अद्याप फरार आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले आहे. या प्रकरणाचा सध्या तपास सुरू आहे.