बुलढाणा, 10 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) बुलढाणा जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये नागरिकांना केस गळतीचा मोठा त्रास जाणवत आहे. ही केस गळती फक्त केस गळती नसून त्यामुळे नागरिकांना काहीच तासांत पूर्णपणे टक्कल पडत आहे. धक्कादायक बाब म्हणजे या आजाराने बाधित नागरिकांमध्ये लहान मुले, पुरूष तसेच महिलांचा देखील समावेश आहे. गेल्या काही दिवसांपासून टक्कल पडणाऱ्या नागरिकांमध्ये झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. सध्या या भागात टक्कल पडणाऱ्या नागरिकांची संख्या 100 हून अधिक झाली आहे. त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिस्थितीची जिल्हा प्रशासनाने गंभीर दखल घेत त्वरीत उपाययोजना सुरू केल्या आहेत.
https://x.com/InfoBuldhana/status/1877399416664969538?t=nhxls30BMpNWBQV_DH1zNg&s=19
https://x.com/InfoBuldhana/status/1877400037405204670?t=vp_l7_nX6TlaBmYC5c1D5g&s=19
अकरा गावे बाधित
बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव, कालवड, बोंडगाव, कठोरा, भोनगाव, हिंगणा वैजिनाथ, बुई, माटरगाव, पहुजीरा आणि निंदी या 11 गावांत टक्कल पडणारे रुग्ण आढळून येत आहेत. यासंदर्भात प्रशासनाने तपासणी केली. शासनाकडून प्राप्त अहवालानुसार, बाधित गावांतील पाणी पिण्यास व वापरण्यास अयोग्य असल्याचे निष्पन्न झाले आहे. या पाण्यात नायट्रेट आणि टीडीएसचे प्रमाण जास्त असल्याचे स्पष्ट झाले आहे. बोअरवेल आणि विहिरींचे पाणी आरोग्यासाठी धोकादायक असल्याचे या अहवालात म्हटले आहे.
पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले
बुलढाणा जिल्ह्यातील वारी हनुमान येथील धरणातील पाणी पिण्यास योग्य असल्याचे प्राथमिक तपासणीत स्पष्ट झाले आहे. मात्र, बाधित भागातील पाण्यातील आरसेनिक आणि लीडसारख्या हेवी मेटल्सची तपासणी होणे अत्यावश्यक असल्याचे समोर आले आहे. पाण्याचे नमुने नागपूर येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले असून, त्वचेचे व पाण्याचे नमुने तपासण्यास आठ ते दहा दिवसांचा कालावधी लागणार आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
वैद्यकीय पथक गावात येणार
दरम्यान, वैद्यकीय महाविद्यालय व राज्यस्तरीय वैद्यकीय पथक लवकरच बुलढाणा जिल्ह्यातील बाधित गावांना भेट देणार आहे. जिल्हा प्रशासनाने नागरिकांना बाधित गावांतील पाणी न वापरण्यास सांगितले आहे. तसेच नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे व अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.