मुंबई, 10 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) मुंबईतील कुर्ला परिसरात 9 डिसेंबर 2024 रोजी एका इलेक्ट्रिक बेस्ट बसने अनेक वाहनांना आणि नागरिकांना चिरडले होते. या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला, तर 48 जण गंभीर जखमी झाले होते. या प्रकरणात पोलिसांनी बस चालक संजय मोरे याला अटक केली होती. त्यानंतर या प्रकरणात आरोपी चालक संजय मोरे याने जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. त्याच्या जामीन अर्जावर आज (दि.10) मुंबईच्या न्यायालयात सुनावणी झाली. त्यावेळी मुंबई न्यायालयाने आरोपी संतोष मोरेचा जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे या प्रकरणातील पुढील तपास आणि कायदेशीर कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
https://x.com/PTI_News/status/1877675530842951881?t=B2QE2iWe7bDwre1rNqh8sQ&s=19
कुर्ला बेस्ट बस अपघात
मुंबईतील कुर्ला पश्चिम बसस्थानक ते अंधेरी पूर्व बसस्थानक या मार्गावरून ही बेस्ट बस जात होती. त्यावेळी भरधाव वेगात असलेल्या या बसने रस्त्यावरील अनेक लोकांना आणि वाहनांना चिरडले. ही घटना 9 डिसेंबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली होती. या अपघातात आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 48 जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी या बसचा ड्रायव्हर संजय मोरे याला अटक करून त्याच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे. दरम्यान, या अपघातामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
राज्य सरकार आणि बेस्टकडून मदत
राज्य सरकारने आणि बेस्टने या अपघाताची दखल घेतली आहे. राज्य सरकारने या अपघात मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. तर बेस्टने देखील या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची तातडीची मदत जाहीर केली आहे. तसेच जखमींच्या उपचारांचा खर्च मुंबई महानगरपालिका आणि बेस्ट उपक्रमा यांच्या मार्फत करण्यात येणार असल्याचे ही बेस्ट ने जाहीर होते. दरम्यान, हा बस अपघात झाल्यानंतर त्याची चौकशी करण्यासाठी बेस्टने मुख्य वाहतूक व्यवस्थापकांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन केली होती.