गडचिरोली, 10 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) गडचिरोली पोलिसांनी आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांसाठी एक सकारात्मक पाऊल उचलले आहे. पोलिसांमुळे गडचिरोलीतील लॉयड मेटल्स च्या नव्या कंपनीत 48 आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांना नोकरी करण्याची संधी मिळाली आहे. या नोकरीमुळे नक्षलवाद्यांना एक स्थिर आणि तणाव मुक्त जीवन जगण्याची संधी मिळाली आहे.
https://x.com/ANI/status/1877565507941048532?t=8HZp7-cSvEzklufDKDTS3Q&s=19
https://x.com/ANI/status/1877565520574296575
15 ते 20 हजार रुपये पगार
या कंपनीने प्रथम नक्षलवाद्यांचे त्यांच्या शिक्षण आणि कौशल्यानुसार प्रोफाईल तयार केले आणि त्यांना तीन महिन्यांचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर लॉयड मेटल्सच्या विविध युनिट्समध्ये आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांना कामावर ठेवले गेले आहे. त्यांना महिन्याला 15 ते 20 हजार रुपये इतका पगार दिला जात आहे. दरम्यान, काहीच दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गडचिरोली जिल्ह्यातील 11 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले होते. तर गडचिरोली जिल्ह्यात आतापर्यंत आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांची संख्या 600 हून अधिक आहे.
आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्याची प्रतिक्रिया
आत्मसमर्पण केलेला नक्षलवादी मनीराम अटल याने पोलिसांच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. त्याने आपला अनुभव सांगताना म्हटले की, “पूर्वी मी चुकीच्या वाटेवर होतो. जिथे माझं मरण निश्चित होतं. त्यामुळे नक्षलवादी जीवनातून बाहेर पडण्याची आणि मुख्यधारेत सामील होण्याची आवश्यकता होती. म्हणूनच मी गडचिरोलीत आत्मसमर्पण करण्याचा निर्णय घेतला. आता मला चांगलं जीवन जगायला मिळालं आहे. लॉयड मेटल्स मध्ये नोकरी मिळाल्यामुळे मी ताण-तणावाशिवाय आणि आत्मनिर्भर होऊन जीवन जगू शकतो. मी यामुळे खूप आनंदी आहे,” असे या आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्याने म्हटले आहे.
पोलिसांच्या पुढाकाराने नक्षलवाद्यांचे जीवन सुधारले
गडचिरोली पोलिसांच्या पुढाकाराने नक्षलवाद्यांना मुख्यधारेत सामील होण्याची आणि समाजासाठी उपयोगी होण्याची संधी मिळाली आहे. सरकार आणि पोलिसांच्या या उपक्रमामुळे नक्षलवादाच्या समस्या सोडवण्यासाठी एक सकारात्मक दिशा मिळाली आहे. यामुळे इतर नक्षलवादीही आत्मसमर्पण करण्यास प्रेरित होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या उपक्रमामुळे नक्षलवाद्यांना त्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत होणार आहे. या प्रकारच्या उपक्रमामुळे नक्षलवादावर नियंत्रण ठेवण्यासाठी एक सकारात्मक वातावरण तयार होईल आणि समाजात शांतता आणि विकास साधता येईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.