नाशिक, 09 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) नाशिक शहर पोलिसांनी कोट्यवधी किमतीच्या चोरीला गेलेल्या वस्तू त्यांच्या मालकांना परत केल्या आहेत. दरम्यान, 2 जानेवारी रोजी महाराष्ट्र पोलिसांचा स्थापना दिन उत्साहात साजरा करण्यात आला. त्यानुसार राज्यभरात पोलिसांकडून सध्या विविध उपक्रम राबवले जात आहेत. नाशिक शहर पोलिसांनी त्याचाच भाग म्हणून एक खास उपक्रम राबवला. यामध्ये पोलिसांनी नाशिक शहरात 3.5 कोटी रुपये किमतीच्या चोरलेल्या वस्तू त्यांच्या खऱ्या मालकांना परत केल्या आहेत.
https://x.com/ANI/status/1877149806923231294?t=GcR4v4jOc9KBUIv0pEGamQ&s=19
3.5 कोटी रुपयांच्या वस्तू परत केल्या
त्यासाठी नाशिक शहर पोलिसांच्या वतीने खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नाशिक पोलिसांच्या या उपक्रमाने मोठा आदर्श निर्माण केला आहे. नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्निक यांनी या बाबतीत माहिती देताना सांगितले, “2 जानेवारी हा महाराष्ट्र पोलिसांचा स्थापना दिन आहे. यानिमित्ताने आम्ही राज्यभर विविध उपक्रम राबवले आहेत. त्यामध्ये चोरलेल्या वस्तू त्यांच्या मालकांना परत करणे हा एक महत्त्वाचा उपक्रम आहे. आम्ही नाशिक शहरात आज 3.5 कोटी रुपये किमतीच्या चोरीच्या वस्तू मालकांना परत केल्या आहेत.”
नाशिक पोलिसांचा स्तुत्य उपक्रम
दरम्यान चोरी गेलेल्या या वस्तूंमध्ये सोन्या चांदीचे मौल्यवान दागिने, मोबाईल, वाहने यांसारख्या 3.5 कोटी रुपयांच्या वस्तूंचा समावेश आहे. नाशिक शहर पोलिसांकडे गेल्या वर्षभरात या वस्तू चोरी गेलेल्या तक्रारी आल्या होत्या. त्यानंतर पोलिसांनी त्याचा तपास करून आरोपींचा शोध घेतला आणि त्यांनी या कारवाईत चोरी गेलेल्या वस्तू जप्त केल्या होत्या. नाशिक पोलिसांनी आज चोरी गेलेल्या या वस्तू त्यांच्या खऱ्या मालकांना सुपूर्द केल्या. ही वस्तू परत करण्याची प्रक्रिया योग्य तपासणीनंतरच पार पडली आहे, ज्यामुळे खऱ्या मालकांना त्यांच्या चोरी गेलेल्या वस्तू परत मिळाल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी आनंद व्यक्त करीत पोलिसांचे आभार मानले आहेत. या उपक्रमामुळे नाशिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर विश्वास वाढेल. तसेच पोलिसांच्या कारभारावर जनतेच्या मनात दृढ विश्वास निर्माण होईल, अशी अपेक्षा आहे.