पुणे, 08 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) पुण्यातील येरवडा परिसरात एका आयटी कंपनीत काम करणाऱ्या युवकाने सहकारी युवतीवर धारधार शस्त्राने हल्ला केला केल्याची घटना घडली. या हल्ल्यादरम्यान युवती गंभीरपणे जखमी झाली होती. परंतु, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे पुणे शहरात एकच खळबळ उडाली आहे. ही हत्या आर्थिक वादातून झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी त्या युवतीवर हल्ला करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. त्याला आज (दि.08) कोर्टात हजर करण्यात येणार आहे.
https://x.com/ChakankarSpeaks/status/1876925539388469362?t=Ap-_QBgzIYRXSTM1EiwrHw&s=19
आर्थिक वादातून हत्या
संपूर्ण प्रकरणामध्ये मिळालेल्या माहितीनुसार, हा युवक आणि युवती दोघेही एका नामांकित आयटी कंपनीत काम करत होते. काही महिन्यांपासून त्यांच्यात आर्थिक वाद सुरू होते. ज्यामुळे त्यांचे संबंध ताणले गेले. या वादातून आरोपी युवकाने मंगळवारी (दि.07) आपल्या रागाच्या भरात धारधार शस्त्राचा वापर करून युवतीवर हल्ला केला. या हल्ल्यात ही युवती गंभीर जखमी झाली. या हल्ल्यानंतर युवतीला तातडीने जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला.
आरोपीला अटक
याप्रकरणी येरवडा पोलिसांनी आरोपीविरुद्ध बीएनएसच्या कलम 103 (1) आणि आवश्यक कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. तसेच त्यांनी या आरोपी विरोधातील सर्व पुरावे गोळा केले आहेत. त्यानंतर या आरोपीला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. तर या प्रकरणाचा पुढील तपास येरवडा पोलिसांनी सुरू केला आहे. पोलिसांच्या तपासामुळे या प्रकरणाचा लवकरच उलगडा होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
घटनेमुळे खळबळ
दरम्यान, या घटनेने पुण्यात विविध कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महिलांच्या आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. अशा प्रकारच्या हिंसाचाराच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कडक कायद्यांची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. तसेच अशा आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे.