मुंबई, 08 जानेवारी: (विश्वजीत खाटमोडे) बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी त्यांच्या कुटुंबीयांनी मंगळवारी (दि.07) राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी त्यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासाची माहिती घेतली. याप्रसंगी, संतोष देशमुख यांचे कुटुंबीय, आमदार सुरेश धस आणि आमदार नमिता मुंदडा हे उपस्थित होते. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले असून, देशमुख कुटुंबीयांच्या मागणीनुसार त्यांना हवे असलेले अधिकारी या तपास पथकात समाविष्ट केले जातील, असे आश्वासन यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना दिले.
https://x.com/CMOMaharashtra/status/1876673252422246490?t=39RGlFJvJndD1_l1G6TBog&s=19
मुख्यमंत्र्यांनी दिले आश्वासन
तसेच बीडमधील वाढत्या गुन्हेगारीवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. बीड जिल्ह्यातील गंभीर गुन्हे आणि स्थानिक गुन्हेगारी टोळ्यांच्या वाढत्या कारवायांमुळे जनतेत असुरक्षिततेची भावना वाढली आहे. संतोष देशमुख यांची हत्या ही याच गुन्हेगारीचे उदाहरण असून, या प्रकरणात न्याय मिळावा आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी देशमुख कुटुंबीयांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत, बीडमधील गुन्हेगारी संपविण्यासाठी कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन दिले. बीडमधील गुन्हेगारी जोवर संपत नाही तोवर स्वस्थ बसणार नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा होईपर्यंत कारवाई थांबणार नाही. तसेच या प्रकरणातील एकाही दोषीला सोडणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.
दरम्यान, बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे 9 डिसेंबर 2024 रोजी अपहरण करण्यात आले. त्यानंतर त्यांना अमानुष मारहाण करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत सात जणांना अटक केली आहे. तसेच वाल्मिक कराड याला खंडणी प्रकरणात अटक झाली आहे. तर या प्रकरणातील एक आरोपी सध्या फरार आहे. त्याच्या शोधासाठी पोलिसांकडून अनेक पथके तैनात करण्यात आली आहेत. या प्रकरणामुळे राज्यभरात संतापाचे वातावरण असून त्यातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली जात आहे.