नवी दिल्ली, 27 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) केंद्र सरकारने माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनावर शोक व्यक्त करत देशभरात सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. 27 डिसेंबर ते 2 जानेवारी या कालावधीत हा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. या 7 दिवसांच्या कालावधीत देशातील सर्व शासकीय इमारती तसेच सार्वजनिक ठिकाणी राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर फडकवले जातील. या सोबतच राष्ट्रीय दुखवट्याच्या कालावधीत देशातील कोणत्याही प्रकारच्या मनोरंजनाच्या कार्यक्रमांना स्थगिती देण्यात आली आहे. यासंदर्भातील आदेश केंद्र सरकारने जारी केले आहेत.
https://x.com/ANI/status/1872468327811121633?t=BFGvlNDEg_HkjMmlIfoZag&s=19
सरकारने आजचे सर्व कार्यक्रम रद्द केले
देशाचे माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने आजचे नियोजित सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर आज (दि.27) शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तसेच, भारतीय दूतावास आणि हाय कमिशन्समध्येही त्यांच्या अंतिम संस्काराच्या दिवशी राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर फडकवला जाईल. सर्व राज्य सरकारांना आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रशासनाला या आदेशाची तत्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
डॉ. मनमोहन सिंग 92 व्या वर्षी गुरूवारी सायंकाळी निधन झाले. मनमोहन सिंग हे 2004 ते 2014 या कालावधीत भारताचे पंतप्रधान होते. देशाच्या आर्थिक सुधारणांमध्ये आणि जागतिक कूटनीतीच्या विकासात त्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे होते. डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वामुळे आणि देशासाठी केलेल्या कामामुळे त्यांचा प्रभाव कायमचा राहिला आहे. मनमोहन सिंग निधनाने संपूर्ण देशभरात शोककळा पसरली आहे. त्यांचे निधन संपूर्ण देशासाठी अत्यंत दुःखाचा क्षण आहे. डॉ. मनमोहन सिंग यांच्या पश्चात पत्नी गुरचरण सिंग आणि तीन मुली असा परिवार आहे.