मेलबर्न, 26 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) मेलबर्न येथे खेळल्या जाणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ ऑस्ट्रेलियासाठी समाधानकारक ठरला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवसअखेर 6 बाद 311 धावा केल्या. मेलबर्न येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या कसोटी सामन्याला आजपासून (दि.26) सुरूवात झाली. बॉक्सिंग डे टेस्ट मॅच म्हणून प्रसिद्ध असलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्या फलंदाजांनी आक्रमकपणे सुरूवात केली.
https://x.com/BCCI/status/1872178778228904092?t=rMAXzEtIsCoaLlWByqfH1Q&s=19
ऑस्ट्रेलियाची शानदार फलंदाजी
या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पदार्पणाची संधी मिळालेल्या 19 वर्षीय सॅम कॉन्स्टन्सने आपल्या पहिल्याच सामन्यात प्रभावी कामगिरी करत 65 चेंडूत 60 धावांची खेळी केली. त्याच्या या शानदार खेळीने ऑस्ट्रेलियाला चांगली सुरूवात मिळवून दिली. दुसरीकडे अनुभवी उस्मान ख्वाजा (57) आणि मार्नस लॅबुशेन (72) यांनीही अर्धशतके झळकावत संघाचा डाव मजबूत केला. परंतू लॅबुशेन बाद झाल्यावर ऑस्ट्रेलियाच्या तीन विकेट लवकर पडल्या. त्यावेळी ट्रॅव्हिस हेड खाते न उघडता बाद झाला, आणि मिचेल मार्श 4 धावा काढून तंबूत परतला. त्यामुळे भारतीय संघाला या सामन्यात पुनरागमन करण्याची थोडी संधी मिळाली आहे. फलंदाजांच्या या कामगिरीमुळे ऑस्ट्रेलियाने दिवसअखेर 6 बाद 311 धावा केल्या. तर स्टीव्ह स्मिथ 68 आणि पॅट कमिन्स 8 धावांवर नाबाद खेळत आहेत.
https://x.com/BCCI/status/1872157311244161401?t=CikQ-YgPxIt_MgQ2dzrJ-w&s=19
जसप्रीत बुमराहच्या तीन विकेट
या कसोटीत भारतीय गोलंदाजांनी मधल्या षटकांत संयमी गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियाला काही प्रमाणात रोखले. या सामन्यात भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 3 बळी घेतले. तर आकाशदीप, रवींद्र जडेजा, आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली. दरम्यान, भारतीय संघाला दुसऱ्या दिवशी लवकरात लवकर ऑस्ट्रेलियाचा डाव गुंडाळण्याचा प्रयत्न करावा लागणार आहे. तर ऑस्ट्रेलियाचा उद्देश 400 हून अधिक धावसंख्या उभारण्याचा असणार आहे. या सामन्यात दोन्ही संघ जिंकण्याच्याच इराद्याने मैदानावर उतरले आहेत. कारण या मालिकेतील निकाल वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे हा सामना दोन्ही संघांसाठी निर्णायक ठरण्याची शक्यता असून क्रिकेट चाहत्यांचे देखील या सामन्याकडे लक्ष लागले आहे.