आजपासून पुढील तीन दिवस गारपीट आणि अवकाळी पावसाचा इशारा

पुणे, 26 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) राज्यात आजपासून (दि.26) पुढील 3 दिवस गारपीट आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. येत्या 26 ते 28 डिसेंबर या कालावधीत राज्यात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे पुणे हवामान विभागाचे प्रमुख केएस होसाळीकर यांनी म्हटले आहे. विशेषतः 27 डिसेंबरला मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या भागांमध्ये गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात सध्या अंशतः ढगाळ हवामान पाहायला मिळाले आहे. हवामानातील बदलामुळे राज्यात हा पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर 28 डिसेंबरपासून हा पावसाचा हा प्रभाव हळूहळू कमी होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

https://x.com/Hosalikar_KS/status/1872125829632897504?t=1omVQM8hLCFijpMJvIk0bw&s=19

शेतकऱ्यांची काळजी वाढली

अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा इशारा यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. शेतकऱ्यांसाठी ही परिस्थिती चिंतेची आहे, कारण अवकाळी पाऊस आणि गारपीट यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होऊ शकते. कापूस, गहू, डाळिंब, फळबागा तसेच इतर उभ्या पिकांवर गारपिटीचा फटका बसण्याची शक्यता आहे. गारपिटीचा धोका लक्षात घेता, शेतकऱ्यांनी पिकांचे रक्षण करण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी. कापणी केलेले धान्य झाकून ठेवावे. तसेच फळबागांसाठी संरक्षणात्मक साहित्याचा वापर करावा. शेतकऱ्यांनी पिकांचे नुकसान टाळण्यासाठी योग्य ती उपाययोजना करावी. गुरे-ढोरे सुरक्षित ठिकाणी हलवावीत. तसेच विजेपासून बचावासाठी आवश्यक ती काळजी घ्यावी. विजेपासून बचावासाठी शेतकऱ्यांनी उघड्यावर काम करणे टाळावे. हवामानातील या बदलामुळे पुढील काही दिवस सतर्क राहणे आवश्यक आहे.

28 तारखेपासून पावसाचा प्रभाव कमी

तसेच राज्यभरात मेघगर्जनेसह पाऊस आणि गारपिटीच्या शक्यतेमुळे नागरिकांनी देखील योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पावसाच्या परिस्थितीत नागरिकांनी गरज नसताना घराबाहेर पडणे टाळावे. बाहेर पडल्यास सुरक्षित जागी आसरा घ्यावा. विजांच्या कडकडाटापासून बचावासाठी धातूच्या वस्तूंना स्पर्श करणे टाळावे. तर येत्या 28 डिसेंबरपासून पावसाचा प्रभाव कमी होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. परंतू, पुढील काही दिवसांसाठी हवामान खात्याच्या सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *