कझाकस्तान, 25 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) कझाकस्तानमध्ये बुधवारी (दि.25) विमान अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या विमानात 67 प्रवासी प्रवास करत होते. अपघातानंतर विमानाला आग लागली असून, मदत आणि बचाव पथक घटनास्थळी पोहोचले आहे. या दुर्घटनेत 30 हून अधिक जणांचा जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र, मृतांची नेमकी संख्या अद्याप समोर आलेली नाही. त्याचवेळी 32 जणांना वाचवण्यात आले आहे. या विमान अपघाताचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये हे विमान वेगाने खाली पडताना दिसत आहे. या अपघातानंतर हे विमान मैदानी भागात कोसळले आणि त्यानंतर या विमानाला आग लागली असल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. दरम्यान, या अपघाताचे कारण अद्याप समजू शकले नाही.
https://x.com/ANI/status/1871821664226603224?t=FqdA6lzpYaRpEVrShFTQTw&s=19
जखमींवर रूग्णालयात उपचार सुरू
अझरबैजान एअरलाईन्सच्या एम्ब्रेयर 190 या विमानाचा हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. हे विमान अझरबैजानची राजधानी बाकूहून रशियातील चेचन्याच्या ग्रोझनीकडे जात होते. अपघातावेळी या विमानात 62 प्रवासी आणि पाच क्रू मेंबर्स होते. या अपघाताची माहिती मिळताच बचाव पथक घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर त्यांनी विमानाला लागलेली आग विझविली आणि जखमींना बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले. या अपघातातील 29 जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्राथमिक माहितीनुसार, या अपघातात दोन्ही वैमानिकांचा मृत्यू झाल्याचे आपत्कालीन पथकाने सांगितले आहे.
हे विमान अझरबैजानची राजधानी बाकू येथून रशियातील ग्रोझनी शहराकडे जात असल्याचे सांगण्यात आले. मात्र ग्रोझनीमध्ये धुक्यामुळे त्याचा मार्ग बदलण्यात आला. त्यावेळी कझाकिस्तानमधील अकताऊ शहराजवळ हे विमान कोसळले. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून, या अपघाताच्या कारणांचा शोध घेऊन भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी योग्य ती पावले उचलणे गरजेचे आहे.