मुंबई, 25 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतील लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात वितरित करण्यास मंगळवार (दि.24) पासून सुरूवात झाली आहे. पैसे जमा करण्याची प्रक्रिया पुढील दोन ते तीन दिवस चालणार आहे. याची माहिती राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा लाभ पात्र महिलांना पुढील दोन ते तीन दिवसांत मिळणार असल्याने लाभार्थी महिलांमध्ये सध्या आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान, या योजनेअंतर्गत महिलांना यापूर्वीच पाच हप्त्यांचा लाभ देण्यात आला आहे. या योजनेतून पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांचा लाभ मिळतो.
https://x.com/iAditiTatkare/status/1871586416142033313?t=im0SB2JvpIOEL98zOBiaeQ&s=19
महिलांना योजनेचे पैसे मिळणार
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. त्यामुळे लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्यातील हप्ता कधी मिळणार? असा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु राज्य सरकारकडून यासंदर्भात वेळोवेळी स्पष्टीकरण देण्यात आले होते. ही योजना कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नसल्याचे सरकारने सांगितले होते. त्यानुसार आता राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा या महिन्यातील 1500 रुपयांचा लाभ देण्यास सुरूवात केली आहे.
आणखी 12 लाखांहून अधिक महिलांचा समावेश
विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे लाडकी बहीण योजनेची थांबलेली प्रक्रिया आता पुन्हा सुरू करून टप्प्याटप्प्याने पात्र भगिनींना सन्मान निधी वितरित करण्यास सुरूवात झाली असल्याची माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे. तत्पूर्वी राज्य सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा शेवटचा लाभ ऑक्टोंबर महिन्यात वितरीत करण्यात आला होता. त्यावेळी सरकारने 2 कोटी 34 लाख महिलांच्या बँक खात्यात पैसे जमा केले होते. आता या योजनेच्या लाभार्थी महिलांच्या संख्येत आणखी 12 लाखांहून अधिक महिलांची वाढ झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या लाभार्थी महिलांची संख्या आता 2 कोटी 46 लाखांच्या घरात झाली आहे.
67 लाखांहून अधिक महिलांच्या खात्यात पैसे ट्रान्स्फर!
ज्या महिलांना आधार सीडिंगमुळे लाडकी बहीण योजनेचा लाभ अद्याप मिळाला नाही, अशा आधार सीडिंग झालेल्या लाभार्थी महिलांना देखील या योजनेचा लाभ देण्यास सुरूवात झाली असल्याची माहिती आदिती तटकरे यांनी यावेळी दिली. तसेच बँक खात्यात पैसे जमा करण्याची ही प्रक्रिया पुढील दोन ते तीन दिवस चालणार आहे. त्यानुसार मंगळवारी (दि.24) पहिल्या टप्प्यात 67 लाख 92 हजार 292 महिलांच्या बँक खात्यात पैसे टाकण्यात आले आहेत. तर उर्वरित महिलांना हा लाभ टप्प्याटप्प्याने दोन ते तीन दिवसांत मिळेल, असे आदिती तटकरे यांनी यावेळी सांगितले.