हैदराबाद, 23 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) साऊथ अभिनेता अल्लू अर्जुनच्या ज्युबली हिल्स येथील निवासस्थानाबाहेर काही लोकांनी तोडफोड केल्याची घटना रविवारी (दि.22) सायंकाळी घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी सहा जणांना अटक केली होती. या सहा जणांना आज (दि.23) सकाळी हैदराबाद न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे.
https://x.com/ANI/status/1871056689912537194?t=nf9i1BEaWiusIueFBYFdrA&s=19
निवासस्थानाबाहेर तोडफोड
दरम्यान काल दुपारी साडेचारच्या सुमारास हातात फलक घेऊन काही लोक अचानक ज्युबली हिल्स येथील अभिनेता अल्लू अर्जुन यांच्या निवासस्थानी पोहोचले. यावेळी त्यांनी घोषणाबाजी केली. तसेच त्यांच्यापैकी एकाने आवारात चढून टोमॅटो फेकण्यास सुरूवात केली. सोबतच या लोकांनी सुरक्षा कर्मचाऱ्यांशी हाणामारी केली आणि निवासस्थानाबाहेर ठेवलेल्या काही फुलांच्या कुंड्यांचे नुकसान केले, असे पोलिसांनी सांगितले आहे.
सहा जणांना अटक
याप्रकरणी हैदराबाद पोलिसांनी सहा जणांना अटक केली. त्यांच्या विरोधात ज्युबिली हिल्स पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अटक करण्यात आलेल्यांनी आपण उस्मानिया विद्यापीठ संयुक्त कृती समितीचे विद्यार्थी असल्याचा दावा केला आहे. दरम्यान अल्लू अर्जुनच्या पुष्पा 2 चित्रपटाच्या प्रीमियरवेळी झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला होता. चेंगराचेंगरीत मरण पावलेल्या महिलेला न्याय मिळावा या मागणीसाठी या लोकांनी अल्लू अर्जुनच्या निवासस्थानाबाहेर तोडफोड केली असल्याचे सांगितले जात आहे.
चेंगराचेंगरीत महिलेचा मृत्यू
दरम्यान, 4 डिसेंबर रोजी हैदराबादमधील संध्या या सिनेमागृहात पुष्पा 2 चित्रपटाच्या प्रीमियर शोचे आयोजन करण्यात आले होते. या प्रीमियर शोला अल्लू अर्जुनने हजेरी लावली. त्यावेळी हजारो चाहत्यांनी अल्लू अर्जुनची एक झलक पाहण्यासाठी गर्दी केली होती. यादरम्यान मोठी चेंगराचेंगरी झाली. यात एका 35 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आणि तिचा आठ वर्षांचा मुलगा जखमी झाला होता. याप्रकरणात अल्लू अर्जुन विरोधात गुन्हा दाखल झाला होता. तसेच त्याला अटकही करण्यात आली होती. त्यानंतर अल्लू अर्जुनची कोर्टाने जामीनावर सुटका केली होती.