पुणे, 23 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (दि.23) सकाळी रोजगार मेळाव्यात नव्याने भरती झालेल्या 71 हजारांहून अधिक नियुक्ती पत्रांचे वितरण करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली येथे सोमवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नवीन उमेदवारांना नियुक्ती पत्रांचे वाटप केले आहे. या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून देशातील तरूणांना विविध केंद्रीय विभागात नोकऱ्या देण्यात आल्या आहेत. यामध्ये तरूणांना गृह मंत्रालय, पोस्ट विभाग, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, वित्तीय सेवा विभाग आणि उच्च शिक्षण विभागासह केंद्रीय विभागांमध्ये नोकऱ्या मिळाल्या आहेत.
https://x.com/AHindinews/status/1871068530759844103?t=VJh_rYiqTcqgB5Z7eHWJZQ&s=19
https://x.com/narendramodi/status/1870873202588889291?t=jGkSf0xAzgJQcE-phL0xOQ&s=19
10 लाख तरूणांना सरकारी नोकऱ्या: मोदी
या कार्यक्रमाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तरूणांना संबोधित केले. आज तुमच्या आयुष्यातील ही एक नवीन सुरुवात आहे. तुमच्या अनेक वर्षांच्या मेहनतीला आज यश आले आहे. 2024 हे वर्ष तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला नवीन आनंद देणारं आहे. याबाबत मी तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो. गेल्या 10 वर्षांपासून केंद्र सरकारच्या विविध मंत्रालये, विभाग आणि संस्थांमध्ये सरकारी नोकऱ्या देण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. आजही 71 हजारांहून अधिक तरूणांना नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत. तर या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून गेल्या दीड वर्षात देशातील सुमारे 10 लाख तरूणांना सरकारी नोकऱ्या दिल्या आहेत. हा एक विक्रमच असल्याचे पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.
महिलांना प्रत्येक क्षेत्रात स्वावलंबी बनविण्याचा प्रयत्न: मोदी
भारताने 2047 पर्यंत विकसित भारत निर्माण करण्याचा संकल्प केला आहे. आमचा या संकल्पावर विश्वास आहे. हे ध्येय साध्य करण्याचा आमचा विश्वास आहे. भारतातील तरूण आज नव्या आत्मविश्वासाने भरलेले आहेत. तसेच ते प्रत्येक क्षेत्रात आपला झेंडा फडकवत आहेत. आज आपण जगातील 5 वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनलो आहोत, असे पंतप्रधानांनी यावेळी म्हटले आहे. तसेच आज हजारो मुलींना देखील नियुक्तीपत्रे देण्यात आली आहेत. तुमचे यश इतर महिलांना प्रेरणा देईल. महिलांनी प्रत्येक क्षेत्रात स्वावलंबी व्हावे असा आमचा प्रयत्न आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.