मद्यधुंद अवस्थेतील डंपर चालकाने 9 जणांना चिरडले, तिघांचा जागीच मृत्यू

पुणे, 23 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) पुणे जिल्ह्यातील वाघोली येथे मोठा अपघात झाला आहे. वाघोली येथील केसनंद फाट्याजवळ मद्यधुंद अवस्थेत असलेल्या एका डंपर चालकाने मद्यधुंद अवस्थेत फुटपाथवर झोपलेल्या 9 जणांना चिरडल्याची घटना घडली आहे. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर सहा जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन चिमुकल्या मुलांचा समावेश आहे. ही घटना मध्यरात्री (दि.23) साडेबाराच्या सुमारास घडली. या घटनेमुळे राज्यभरात सध्या हळहळ व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी पोलिसांनी त्या डंपर चालकाला अटक केली आहे. त्याच्या विरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पुणे शहर पोलिसांचे डीसीपी झोन 4 हिम्मत जाधव यांनी दिली आहे.

https://x.com/ANI/status/1871020127837429989?t=rHHdCAapiLB5QJhZmiCm5Q&s=19

तिघांचा मृत्यू, सहा जखमी

फुटपाथवर झोपलेले हे सर्वजण कामगार असून यामध्ये त्यांच्यासोबत त्यांची लहान मुले देखील होती. ते सर्वजण अमरावतीवरून पुण्यात कामासाठी आले होते. ते काल रात्री वाघोली येथील केसनंद फाट्याजवळील फुटपाथवर झोपले होते. त्यावेळी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास मद्यधुंद अवस्थेत असलेल्या एका डंपर चालकाने फुटपाथवरील 9 जणांना चिरडले. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. तर सहा जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने पुण्यातील ससून रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. यातील काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

डंपर चालकाला अटक

या अपघातप्रकरणी पोलिसांनी त्या डंपर चालकाला अटक केली आहे. हा डंपर चालक दारूच्या नशेत असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. या अपघातामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. याप्रकरणी डंपर चालकाच्या विरोधात मोटार वाहन कायदा आणि बीएनएसच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर या चालकाला वैद्यकीय चाचणीसाठी नेण्यात आले. या अपघात प्रकरणाचा तपास सध्या पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *