बारामती, 22 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन काल (दि.21) समाप्त झाले आहे. त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे ॲक्शन मोडमध्ये आल्याचे पाहायला मिळाले आहे. अजित पवार यांनी आज (दि.22) पहाटे बारामती मतदारसंघातील विविध विकासकामांचा आढावा घेतला. तसेच त्यांनी यावेळी या संदर्भातील विविध सूचना सबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. त्याची माहिती अजित पवार यांनी सोशल मीडियावरून दिली आहे. सोबतच अजित पवारांनी एका कार्यक्रमात राज्याचा अर्थसंकल्प येत्या 3 मार्च रोजी सादर करणार असल्याचे सांगितले आहे.
https://x.com/AjitPawarSpeaks/status/1870695717548990853?t=K3LWWNm-d9-qww3QHzxEoA&s=19
या विकासकामांना भेट दिली
दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वप्रथम बारामती तालुक्यातील मेडद येथील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाची आणि रुई येथील शासकीय रुग्णालयाच्या कामाची पाहणी केली. यासोबतच श्रीमंत बाबूजी नाईक वाडा, मारूती मंदिर आणि कऱ्हा नदी परिसरातील कामांची पाहणी केली. यावेळी अजित पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून कामाबाबतची तांत्रिक माहिती जाणून घेतली. ही कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करावीत अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या. सोबतच अजित पवार यांनी विद्या प्रतिष्ठान येथील एआय सेंटरच्या कामाचा देखील आढावा घेतला. तसेच त्यांनी यावेळी या कामांबाबतची आवश्यक ती माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली.
शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाची पाहणी
बारामती मतदारसंघातील विविध विकासकामांचा आढावा घेत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मेडद येथील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाची पाहणी केली. यादरम्यान त्यांनी महाविद्यालयातील साधनसामग्री, सोयीसुविधांची संबंधित अधिकाऱ्यांकडून घेतली. या महाविद्यालयात आयुर्वेदिक पद्धतीने उपचार पद्धतीचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना घेता येणार आहे. यापूर्वीच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बारामतीत सुरू झाले आहे. तिथे हे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यात आता शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयाची भर पडल्याने वैद्यकीय शिक्षणाचा हब म्हणून बारामतीची ओळख निर्माण होईल यात शंका नाही, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.