कल्याण, 20 डिसेंबर: (विश्वजीत खाटमोडे) कल्याण परिसरातील आजमेरा हाईट्स या सोसायटीत धूप-अगरबत्ती लावल्यावरून मोठा वाद झाला. या वादातून एका परप्रांतीय व्यक्तीने बाहेरून लोक बोलवून मराठी कुटुंबातील तिघांना जबर मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेवेळी त्या परप्रांतीय व्यक्तीने मराठी माणसांविषयी आक्षेपार्ह वक्तव्ये केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या मारहाणीत एक व्यक्ती गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर मुंबईतील सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यात अभिजित देशमुख गंभीर जखमी झाले असून त्यांच्या डोक्याला 10 टाके पडल्याचे सांगितले जात आहे.
https://x.com/ANI/status/1870026403347083275?t=1p9Q0ZK6KZzILLS2wHjLHQ&s=19
तसेच या मारहाणीत अभिजित देशमुख यांचे बंधू धीरज देशमुख यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील महिला जखमी झाल्या आहेत. दरम्यान, अखिलेश शुक्ला असे हा हल्ला करणाऱ्या परप्रांतीय व्यक्तीचे नाव आहे. तो महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळात अकाऊंट मॅनेजर या पदावर कामाला आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे या घटनेचे पडसाद राज्यभरात उमटू लागले होते. या घटनेवरून संतापाची लाट तयार झाली आहे. मराठी माणसांवर प्राणघातक हल्ला करणाऱ्या अखिलेश शुक्ला याला कामावरून बडतर्फ करावे आणि त्याच्या विरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत होती.
अखिलेश शुक्लाला अटक
त्यानुसार, या घटनेनंतर अखिलेश शुक्ला आणि त्यांच्या पत्नीविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी शुक्रवारी (दि.20) अखिलेश शुक्ला याला ताब्यात घेतले आहे. कल्याण येथील एका सोसायटीत अखिलेश शुक्ला व त्याच्या पत्नीने भांडणात मराठी माणसाचा अवमान केला. या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. शुक्ला हा एमटीडीसी चा कर्मचारी असून त्याला तत्काळ निलंबित करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (दि.20) विधानपरिषदेत दिली.
सीएम फडणवीस काय म्हणाले?
मुंबई आणि महाराष्ट्र हा मराठी माणसाचा होता, मराठी माणसाचाच आहे आणि मराठी माणसाचाच राहीन. कधी कधी काही नमुने चुकीचे वक्तव्य करतात. माज आणल्यासारखे करतात, अशा माजोरड्यांचा माज उतरवल्याशिवाय आम्ही राहणार नाही, असा इशारा देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. मराठी माणसाचा आवाज म्हणून मी ठणकावून सांगतो कुठल्याही परिस्थितीत आम्ही मराठी माणसावर अन्याय होऊ देणार नाही, असेही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.
असा झाला वाद
दरम्यान, कल्याण येथील आजमेरा हाईट्स या सोसायटीत राहणाऱ्या अखिलेश शुक्लाची पत्नी गीता आणि वर्षा कल्वीकट्टे यांच्यात धूप-अगरबत्ती लावल्यावरून वाद झाला. आपल्या वृद्ध आईला आणि लहान बाळाला या धूप-अगरबत्ती मुळे त्रास होत असल्याचे वर्षा कल्वीकट्टे यांनी म्हटले होते. त्यावरून अखिलेश शुक्लाच्या पत्नीने त्यांच्याशी वाद घातला. त्यावेळी शेजारी राहणाऱ्या अभिजित देशमुख आणि धीरज देशमुख यांनी हा वाद शांत केला. त्यावरून अखिलेश शुक्लाने बाहेरच्या दहा ते बारा लोकांना बोलवून अभिजित देशमुख आणि धीरज देशमुख यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील महिलांना त्यांच्या घरी जाऊन रॉडने मारहाण केली. ही घटना 18 डिसेंबर रोजी रात्रीच्या सुमारास घडली. या घटनेत अभिजित देशमुख हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तसेच अखिलेश शुक्लाने यावेळी मराठी माणसांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्ये केली असल्याचे म्हटले जात आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.